
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. भारतीय संघासाठी दोन खेळपट्ट्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारताला संथ खेळपट्ट्यांवर खेळावे लागणार नाही, असे समजते. तूर्तास भारतीय संघ मात्र अन्य खेळपट्ट्यांवर सराव करत आहे.
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. २०१७नंतर प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार असली तरी भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे भारतीय संघ २००८पासून एकदाही पाकिस्तानला गेलेला नाही. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारताचा संघ २० तारखेला बांगलादेशविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीला भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडेल. २ मार्चला भारत-न्यूझीलंड आमनेसामने येतील.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकही सराव सामना खेळणार नाही. १५ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र भारताने नुकताच इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. त्यामुळे भारत, इंग्लंड या दोन्ही संघांनी सराव सामन्यास नकार दर्शवला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका हे पाच संघच सराव सामने खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियानेही सराव सामने खेळण्यास उत्साह दर्शवलेला नाही.
पंतला दुखापत
भारतीय संघाने रविवारपासून सरावाला प्रारंभ केला. मात्र अष्टपैलू हार्दिक पंड्या फलंदाजीचा सराव करताना त्याने मारलेला एक फटका ऋषभ पंतच्या गुडघ्यावर आढळला. पंतच्या वेदना पाहून फिजिओ धावत त्याच्याजवळ गेला आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन आला. ज्या वेगाने चेंडू पंतच्या गुडघ्यावर आदळला, त्यावरून फटका जोरात बसल्याचे दिसत होते. मात्र पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार पंतची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे समजते. प्रशिक्षक गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच के. एल. राहुल प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पंतला तूर्तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.