वरुणचे चक्रव्यूह भेदण्यात किवी अपयशी; फिरकीपटूंमुळे भारताचे न्यूझीलंडवर ४४ धावांनी वर्चस्व; मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी उपांत्य लढत

दुबईच्या रणांगणात रविवारी भारताच्या फिरकीचे चक्रव्यूह भेदण्यात किवी फलंदाजांना अपयश आले.
वरुणचे चक्रव्यूह भेदण्यात किवी अपयशी; फिरकीपटूंमुळे भारताचे न्यूझीलंडवर ४४ धावांनी वर्चस्व; मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी उपांत्य लढत
Published on

दुबई : दुबईच्या रणांगणात रविवारी भारताच्या फिरकीचे चक्रव्यूह भेदण्यात किवी फलंदाजांना अपयश आले. जादुई फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने (४२ धावांत ५ बळी) मिळवलेल्या पाच बळींच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला ४४ धावांनी पराभूत केले. त्यामुळे भारताने अ-गटात विजयी हॅटट्रिक साकारून अग्रस्थानासह आगेकूच केली. आता मंगळवारी रंगणाऱ्या उपांत्य सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

दुबई क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अ-गटातील या लढतीत दोन्ही संघ सलग तिसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरले होते. मात्र भारताने दिलेल्या २५० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४५.३ षटकांत २०५ धावांत गारद झाला. वरुणला चायनामन कुलदीप यादवने २, तर रवींद्र जडेजा व अक्षर पटेल या डावखुऱ्या फिरकीपटूंनी प्रत्येकी १ विकेट घेत उत्तम साथ दिली. तसेच हार्दिक पंड्याने १ बळी मिळवला. आता मंगळवारी दुबईतच भारताची ऑस्ट्रेलियाशी उपांत्य फेरीत गाठ पडेल. तर बुधवारी दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड आमनेसमाने येतील. या दोन्ही लढतींसाठी राखीव दिवस ठे‌वण्यात आले आहेत. रविवार, ९ मार्चला अंतिम सामना रंगणार आहे.

प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात खेळणाऱ्या भारताने अनुक्रमे बांगलादेश, पाकिस्तान या दोन संघांना धूळ चारून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले होते. दुसरीकडे मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझीलंडने प्रथम पाकिस्तान, तर नंतर बांगलादेशला पराभूत केले होते. त्यामुळे या लढतीद्वारे गटातील फक्त दोन्ही संघांचा क्रम ठरणे बाकी होती. भारतीय संघ रोहित व मोहम्मद शमी यांना विश्रांती देईल, असे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हर्षित राणाला विश्रांती देऊन वरुणला संधी देण्यात आली. न्यूझीलंडने डेवॉन कॉन्वेच्या जागी डॅरेल मिचेलला संघात घेतले. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

भारताची सुरुवात मात्र खराब झाली. शुभमन गिल तिसऱ्याच षटकात २ धावांवर मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर पायचित झाला. रोहितने १ चौकार व षटकार लगावून आक्रमकता दाखवली. मात्र कायले जेमिसनने त्याचा १५ धावांवर अडसर दूर केला. हे कमी म्हणून की काय पॉइंटवर उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्सने हेन्रीच्या गोलंदाजीवर विराटचा अफलातून हवेत सूर मारत एकहाती झेल टिपला. विराटने ११ धावा केल्या. ३ बाद ३० अशी स्थिती असताना मुंबईकर श्रेयस अय्यर व अक्षर यांची जोडी जमली.

या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांवर भर देत चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. श्रेयसने सलग दुसरे व एकदिवसीय कारकीर्दीतील २१वे अर्धशतक साकारले. त्याने ४ चौकार व २ षटकार लगावले. तर अक्षरने ३ चौकार व १ षटकारासह ६१ चेंडूंत ४२ धावा केल्या. अखेर रचिन रवींद्रने अक्षरचा अडसर दूर केला. त्यानंतर श्रेयस व के. एल. राहुल यांनी पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भर घातली. मात्र ओरूर्कने श्रेयसला बाद केले व भारताची धावगती मंदावली.

राहुल (२३), जडेजा (२०) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. हार्दिकने मात्र ४ चौकार व २ षटकारांसह ४५ धावा काढून भारताला अडीचशे धावांपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. हेन्रीनेच ५०व्या षटकात हेन्रीसह शमीचा बळी मिळवून पंचक पूर्ण केले. भारताने ५० षटकांत ९ बाद २४९ धावा केल्या.

मात्र फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर हे आव्हान गाठताना किवी फलंदाजांचा कस लागला. हार्दिकने रवींद्रचा (६) अडसर दूर केल्यावर सहाव्या षटकातच फिरकीपटूचे आगमन झाले. प्रथम वरुणने विल यंगचा (२२) त्रिफळा उडवला. त्यानंतर कुलदीपने मिचेलला (१७) पायचीत पकडले. ३० षटकांनंतर किवी संघाची ३ बाद १२५ अशी स्थिती होती. जडेजाने मग टॉम लॅथमला (१४) बाद करून आणखी दडपण वाढवले.

त्यानंतर वरुणचा प्रभाव वाढला. त्याने फिलिप्स (१२), मिचेल ब्रेसवेल (२), सँटनर (२८) यांचे बळी मिळवून किवींची हालत खराब केली. अखेर विल्यम्सनची अक्षरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळताना यष्टिचीत झाला. त्याने ७ चौकारांसह ८१ धावा केल्या. ४५व्या षटकात हेन्रीला बाद करून वरुणने बळींचे पंचक पूर्ण केले. मग ४६व्या षटकात कुलदीपने ओरूर्कचा त्रिफळा उडवत भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.

२५० धावांचा यशस्वी बचाव करून भारताने अन्य संघांना इशारा दिला आहे. विशेषत: भारतीय फिरकीपटूंसमोर कोणत्याही संघाचे फलंदाज ढेपाळू शकतात. त्यामुळे आता उपांत्य व अंतिम फेरीतही भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखेल, अशी अपेक्षा आहे. २०२३च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताला अंतिम फेरीत नमवले होते. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा घेण्याचीही उत्तम संधी भारताकडे यावेळी आहे. आता कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या क्रीडा विश्वाचे लक्ष लागून आहे.

कारकीर्दीतील दुसराच एकदिवसीय सामना खेळताना वरुणने पाच बळी घेण्याची किमया साधली. तसेच यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी ५ बळी घेणारा तो मोहम्मद शमीनंतरचा दुसरा गोलंदाज ठरला. शमीने बांगलादेशविरुद्ध पाच बळी मिळवले होते. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत वरुणने पदार्पण केले होते. त्यापूर्वी टी-२० मालिकेत त्याने मालिकावीर पुरस्कारही पटकावला होता. त्यामुळे वरुणचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

संक्षिप्त धावफलक

g भारत : ५० षटकांत ९ बाद २४९ (श्रेयस अय्यर ७९, हार्दिक पंड्या ४५, अक्षर पटेल ४२; मॅट हेन्री ५/४२) विजयी वि. g न्यूझीलंड : ४५.३ षटकांत सर्व बाद २०५ (केन विल्यम्सन ८१, मिचेल सँटनर २८; वरुण चक्रवर्ती ५/४२, कुलदीप यादव २/५६)

सामनावीर : वरुण चक्रवर्ती

उपांत्य फेरीचे वेळापत्रक

मंगळवार, ४ मार्च : भारत वि. ऑस्ट्रेलिया (दुबई)

बुधवार, ५ मार्च : दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंड (लाहोर)

अंतिम सामना : रविवार, ९ मार्च (दुबई/लाहोर)

logo
marathi.freepressjournal.in