
दुबई : फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारताच्या जादुई फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला रोखणे आमच्यासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असेल, असे मत न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी व्यक्त केले. सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या निमित्ताने स्टेड यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला.
भारत-न्यूझीलंड यांच्यात रविवार, ९ मार्च रोजी दुबई येथे महाअंतिम मुकाबला रंगणार आहे. एकीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी आतुर आहे, तर दुसरीकडे मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली खेळणारा न्यूझीलंड म्हणजेच किवी संघ दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे या लढतीकडे अवघ्या क्रीडा विश्वाचे लक्ष लागून आहे. मात्र उभय संघांत या स्पर्धेतच झालेल्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडला धूळ चारली होती. त्यावेळी ३३ वर्षीय वरुणने पाच बळी मिळवून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे स्टेड यांनी वरुणला रोखण्याचे किवी फलंदाजांपुढे आव्हान असेल, असे म्हटले आहे.
“भारतीय संघाविरुद्ध तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागतो, यात शंका नाही. विशेषत: साखळी फेरीत फिरकीच्या बळावर भारताने आमची कोंडी केली. अंतिम फेरीतही वरुण संघाचा भाग असेल, असे आम्हाला वाटते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आम्ही विशेष रणनीती आखली आहे. वरुणवर दबाव आणून धावा वसूल केल्यास भारताच्या अन्य फिरकीपटूंवरही दडपण येईल,” असे ५३ वर्षीय स्टेड म्हणाले. न्यूझीलंडचा संघ गुरुवारी सायंकाळी दुबईत दाखल झाला. शुक्रवारपासून त्यांनी सरावाला प्रारंभ केला.
पहिल्या दोन साखळी सामन्यांत संघाबाहेर राहिल्यावर वरुणने न्यूझीलंडविरुद्ध ५, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ बळी मिळवले. यामध्ये ट्रेव्हिस हेडची मोलाची विकेट होती. त्यामुळे अंतिम फेरीतसुद्धा भारतीय संघ वरुण, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल या फिरकी चौकडीसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
“भारताचे चारही फिरकीपटू दमदार आहेत. अंतिम सामन्यात कोणता संघ सकारात्मक खेळ करेल, त्यावर निकाल अवलंबून असेल. आमच्या संघातही फिरकीला चांगले खेळणारे खेळाडू आहेत. तसेच लक्ष फक्त भारताच्या फिरकीपटूंवरच नव्हे, तर फलंदाजांना रोखण्यावरही आहे,” असेही स्टेड यांनी सांगितले. आता एकूणच अंतिम लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
हेन्री अंतिम लढतीला मुकण्याची शक्यता
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणारा मॅट हेन्री खांद्याच्या दुखापतीमुळे अंतिम सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. उपांत्य सामन्यात हेनरिच क्लासेनचा झेल घेताना हेन्रीच्या खांद्याचे स्नायू ताणले गेल्याने त्याने मैदान सोडले होते. प्रशिक्षक स्टेड यांनी शुक्रवारी हेन्रीविषयी अद्याप पूर्ण माहिती नसल्याचे सांगितले. शुक्रवाही हेन्रीने विश्रांतीच प्राधान्य दिले, शनिवारी त्याची तंदुरुस्ती चाचणी होईल. साखळी सामन्यात हेन्रीने भारताविरुद्ध ५ बळी घेतले होते. तसेच स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत हेन्री १० बळींसह अग्रस्थानी आहे. त्यामुळे हेन्री अंतिम लढतीला मुकल्यास न्यूझीलंडला मोठा हादरा बसेल.
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स यांना फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे.
२०२१पासून आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटूला खास पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गिलने फेब्रुवारीत दोन शतके झळकावली. त्याने महिन्यातील पाच सामन्यांत ४०६ धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध ६०, ८७, ११२ धावा करणारा गिल मालिकावीर ठरला.
दुसरीकडे फिलिप्सने फेब्रुवारीत ५ सामन्यांत २३६ धावा केल्या. त्याने न्यूझीलंडला तिरंगी मालिका जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीतही तो छाप पाडत आहे. एकदिवसीय प्रकारातून निवृत्त झालेल्या स्मिथने श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटींमध्ये १४१ व १३१ धावांची खेळी साकारली.
टी-२०, एकदिवसीय प्रकारांत वरुण अव्वल : कार्तिक
वरुण चक्रवर्तीमध्ये टी-२० व एकदिवसीय प्रकारांत भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून नावलौकिक मिळवण्याची क्षमता आहे, असे मत माजी फिरकीपटू मुरली कार्तिकने मांडले. “वरुणकडे कॅरम बॉल, फ्लिपर्स, गुगली, टॉपस्पिन असे विविध अस्त्रे आहेत. पुढील काही वर्षांत त्याने कामगिरीत सातत्य राखले, तर वरुण नक्कीच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा अव्वल फिरकीपटू म्हणून उदयास येईल,” असे एका गोल्फ स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईत आलेला मुरली म्हणाला.