चांदेरे फाउंडेशनने पटकाविला वायुकुमार सुवर्णमहोत्सवी चषक;अजित चौहान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

आक्रमक सुरुवात करीत चांदेरे फाउंडेशनने पहिल्या डावातच २२-१२ अशा १० गुणांची भक्कम आघाडी घेतली
चांदेरे फाउंडेशनने पटकाविला वायुकुमार सुवर्णमहोत्सवी चषक;अजित चौहान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

वायुकुमार विकास मंडळाने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे नांदेडच्या बाबुराव चांदेरे स्पोर्ट्स फाउंडेशनने विजेतेपद पटकाविले. चांदेरे फाउंडेशनचा अजित चौहान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

वडगांव-सहाणी, जुन्नर येथील शरदचंद्र पवार बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात बाबुराव चांदेरे फाउंडेशनने बीडच्या शारदा प्रतिष्ठानचा ४१-२० असा सहज पराभव करत सुवर्णमहोत्सवी चषकावर नाव कोरले. हे दोन्ही संघ एकाच गटात होते.

आक्रमक सुरुवात करीत चांदेरे फाउंडेशनने पहिल्या डावातच २२-१२ अशा १० गुणांची भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावातदेखील तोच जोश कायम राखत शारदा प्रतिष्ठानला पुरते नामोहरण केले. दुसऱ्या डावात बीडकर आपला खेळ विसरले की काय? असे वाटत होते. अजित चौहान, सुनील दुबिले यांच्या झंजावाती चौफेर चढाया त्याला विकास काळे व मनोज बेंद्रे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे चांदेरे फाउंडेशनला हा विजय मिळविण्यास सुलभ गेले. ज्ञानेश्वर जाधव, निखिल आडगाव यांनी शारदा प्रतिष्ठानकडून पहिल्या डावात बऱ्यापैकी प्रतिकार केला. दुसऱ्या डावात ते निस्तेज ठरले. साखळी सामन्यात शारदा प्रतिष्ठानने कडवी लढत देत पहिल्या डावात आघाडीदेखील घेतली होती; पण तो जोश अंतिम सामन्यात त्यांना दाखविता न आल्याने एकतर्फी पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यात बाबुराव चांदेरे प्रतिष्ठानने शाहू-सडोली- कोल्हापूरचा ३४-०९, तर शारदा प्रतिष्ठानने राकेशभाऊ घुले प्रतिष्ठानचा ३६-२३ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. शाहू सडोली-कोल्हापूरचा रोहित साठे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, तर शारदा प्रतिष्ठानचा संदेश देशमुख स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूंचा मान राकेशभाऊ घुले संघाच्या विशाल ताटेने मिळविला. या तिन्ही खेळाडूंना रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून कोल्हापूरच्या छावा क्रीडा मंडळाला गौरविण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in