चंद्रकांत पंडित यांची KKR ला सोडचिठ्ठी; प्रशिक्षकपदावरून पायउतार, कोण घेणार जागा?

अनुभवी प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या कार्यकाळात २०२४मध्ये KKR ने आयपीएलचे जेतेपद मिळवले. मात्र २०२५मध्ये त्यांना गुणतालिकेत आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे संघ व्यवस्थापनाशी झालेल्या...
चंद्रकांत पंडित यांची KKR ला सोडचिठ्ठी; प्रशिक्षकपदावरून पायउतार, कोण घेणार जागा?
Published on

कोलकाता : अनुभवी प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी मंगळवारी आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले ६३ वर्षीय पंडित हे गेली ३ वर्षे कोलकाताचे प्रशिक्षक होते.

पंडित यांच्या कार्यकाळात २०२४मध्ये कोलकाताने आयपीएलचे जेतेपद मिळवले. मात्र २०२५मध्ये त्यांना गुणतालिकेत आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे संघ व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर पंडित यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पंडित हे मुख्य प्रशिक्षक असले, तरी २०२४ मधील जेतेपदाचे श्रेय मार्गदर्शक गौतम गंभीरला देण्यात आले. त्यामुळेच त्यावेळचा कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरनेसुद्धा हा संघ सोडला होता. २०२५मध्ये श्रेयस पंजाब संघाकडून खेळला, तर गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला. मात्र पंडित केकेआरसह कायम होते.

कोण घेणार जागा?

आता पंडित यांच्या राजीनाम्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर कोलकाता संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देणारा माजी कर्णधार इऑन मॉर्गन याच्या नावाचीही चर्चा आहे. मॉर्गनने २०२० आणि २०२१ मध्ये कोलकात्याचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २४ सामने खेळले, त्यापैकी ११ सामने जिंकले.

दरम्यान, पंडित यांच्यानंतर आता केकेआरच्या सपोर्टिंग स्टाफमध्ये मेंटॉर ड्वेन ब्रावो, सहाय्यक कोच ओटिस गिब्सन आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण अशी काही महत्त्वाची नावे अद्यापही आहेत. तथापि, अरुण हेसुद्धा कोलकाता संघाला सोडून एलएसजी अर्थात लखनौ सुपर जायंट्सशी जोडले जाणार असल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in