जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर आरोपपत्र दाखल

ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, “२००६ ते जानेवारी २०१२ दरम्यान, डॉ. फारुख अब्दुल्ला जेकेसीएचे अध्यक्ष होते.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर आरोपपत्र दाखल

जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) कथित आर्थिक भ्रष्टाचारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. याबाबतची माहिती ईडीने दिली.

ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, “२००६ ते जानेवारी २०१२ दरम्यान, डॉ. फारुख अब्दुल्ला जेकेसीएचे अध्यक्ष होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी जेकेसीएमधील पदाधिकाऱ्याच्या बेकायदेशीर नियुक्ती करून त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला. त्यांनी या पदाधिकाऱ्यांना जेकेसीए निधीची अफरातफर करण्याच्या उद्देशाने आर्थिक अधिकार दिले. तपासात असेही दिसून आले आहे की, डॉ. फारुख अब्दुल्ला हे जेकेसीएच्या निधीचे महत्त्वपूर्ण लाभार्थी होते.”

आरोपपत्रात अब्दुल्ला यांच्यासह अहसान अहमद मिर्झा, मीर मंजूर गझनफर आणि इतरांची नावे आहेत. हे आरोपपत्र ४ जून रोजी दाखल करण्यात आले होते; परंतु श्रीनगरमधील विशेष न्यायालयाने मंगळवारी त्याची दखल घेतली. आरोपपत्रात नावे असलेल्या सर्व व्यक्तींना २७ ऑगस्ट रोजी हजर राहण्याची नोटीस न्यायालयाने बजावली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, “हे प्रकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जेकेसीएला दिलेल्या अनुदानातील कथित अफरातफरीशी संबंधित आहे. २०१९मध्ये जेकेसीएच्या पदाधिकाऱ्यांसह इतर अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत ५१.९० कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यापैकी आतापर्यंत २१.५५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे,”

अब्दुल्ला यांची या प्रकरणात यापूर्वीही अनेक वेळा चौकशी करण्यात आली. या वर्षी मे महिन्यात चौकशी करण्यात आली होती. २०२०मध्ये ईडीने या प्रकरणी अब्दुल्लांचा गुपकर रस्त्यावरील बंगला आणि जम्मूतील काही मालमत्ता जप्त करण्यात केली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in