छत्तीसगढचेही दमदार प्रत्युत्तर! आशिष चौहानचे सहा बळी; दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १८० धावा

शशांक चंद्रकार आणि रिषभ तिवारी यांनी छत्तीसगढला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली.
छत्तीसगढचेही दमदार प्रत्युत्तर! आशिष चौहानचे सहा बळी; दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १८० धावा

रायपूर : मध्यमगती गोलंदाज आशिष चौहान याने रणजी करंडक स्पर्धेत दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करत बलाढ्य मुंबईला चोख प्रत्युत्तर दिले. आशिष चौहानने घेतलेल्या सहा विकेट्समुळे छत्तीसगढने मुंबईचा पहिला डाव कालच्या ४ बाद ३१० धावांवरून ३५१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर छत्तीसगढने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १८० धावा केल्या आहेत.

आशिष चौहान आणि रवी किरण यांनी दुसऱ्या दिवशी मुंबईला एकापाठोपाठ हादरे देत मुंबईचा डाव अवघ्या १६ षटकांमध्ये संपुष्टात आणला. पृथ्वी शॉ (१५९) आणि भूपेन ललवानी (१०२) यांची शतकी खेळी मुंबईच्या डावात सर्वोत्तम ठरली. त्यानंतर सूर्यांश शेडगे (२६) याचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. चौहानने ६ तर किरणने ३ विकेट्स मिळवले. त्यानंतर छत्तीसगढने शशांक चंद्रकारची अर्धशतकी खेळी आणि संजीत देसाई आणि अमनदीप खरे यांच्या उपयुक्त योगदानामुळे ४ बाद १८० धावा केल्या.

शशांक चंद्रकार आणि रिषभ तिवारी यांनी छत्तीसगढला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. मुंबईला गेल्या अनेक सामन्यांत विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या मोहित अवस्थीची उणीव मुंबईला जाणवली. तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस, शम्स मुलाणी आणि तनुष कोटियन यांनी मुंबईला प्रत्येकी एक बळी मिळवून दिला असला तरी त्यांना प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश राखता आला नाही. शशांकने ५६, संजीतने ४१ तर अमनदीपने नाबाद ३५ धावा करत छत्तीसगढला चांगल्या स्थितीत आणून ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in