चेन्नईचा कर्णधार ऋतुराजच, सॅमसनकडे नेतृत्व सोपवण्याच्या अफवा फोल; धोनीचा समावेश पक्का

आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडकडेच संघाचे कर्णधारपद कायम राखण्यात येईल, अशी घोषणा चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने मंगळवारी केली.
ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाड
Published on

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२६च्या हंगामासाठी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडकडेच संघाचे कर्णधारपद कायम राखण्यात येईल, अशी घोषणा चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने मंगळवारी केली. त्यामुळे संजू सॅमसन संघात दाखल झाल्यावर त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात येण्याची अपेक्षा फोल ठरली. तसेच ४४ वर्षीय महेंद्रसिंह धोनी हा यंदाची आयपीएल खेळणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आयपीएलच्या १९व्या हंगामासाठी अद्याप पाच महिन्यांचा अवधी आहे. मात्र त्यापूर्वी गेल्या शनिवारी मैदानाबाहेर रंगलेल्या थराराकडे सर्वांचे लक्ष होते. आयपीएलमधील १० संघांनी आगामी हंगामासाठी आपापल्या संघात कायम राखलेल्या (रिटेन) खेळाडूंची यादी जाहीर केलेली आहे. तसेच ट्रेड विंडो म्हणजेच खेळाडूंची अदलाबदल करण्याची किंवा खेळाडू ज्या किमतीला गेल्या हंगामात विकला गेला, तेवढी रक्कम समोरील संघाला देण्याची मुभाही होती. याचा लाभ घेत चेन्नईने राजस्थान रॉयल्सकडून सॅमसनला १८ कोटी रुपयांत खरेदी केले. त्याबदल्यात रवींद्र जडेजा व सॅम करन हे खेळाडू चेन्नईने राजस्थानला दिले.

३१ वर्षीय सॅमसन हा २०१३पासून आयपीएलमध्ये खेळत असून गेल्या काही वर्षांपासून तो राजस्थानचे कर्णधारपदही भूषवत होता. २०२२मध्ये सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र २०२५मध्ये राजस्थान साखळीतच गारद झाला. तसेच सॅमसनची कामगिरीही संमिश्र स्वरूपाची राहिली. अशा स्थितीत सॅमसनने स्वत: संघाला आपल्याला मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली होती. त्यामुळे राजस्थानने चेन्नईशी झालेला करार मान्य केला.

दुसरीकडे २८ वर्षीय ऋतुराज गेल्या दोन हंगामापासून चेन्नईचा कर्णधार आहे. मात्र दोन्ही वेळेस चेन्नईला बाद फेरी गाठता आलेली नाही. २०२५मध्ये दुखापतीमुळे ऋतुराज आयपीएलच्या मध्यातच संघाबाहेर गेला. तेव्हा धोनीने पुन्हा कर्णधारपद स्वीकारले. मात्र धोनीचे वाढते वय पाहता चेन्नईला एका भारतीय यष्टिरक्षक फलंदाजाची नक्कीच गरज होती. सॅमसन संघात आल्यावर अनेकांनी धोनी निवृत्त होत सॅमसनकडे चेन्नईचे कर्णधारपद सोपवण्यात येईल, अशी भाकीते वर्तवली होती. मात्र चेन्नईने ट्विटरवर ऋतुराजच कर्णधार राहणार असल्याचे घोषित केले.

दरम्यान, लिलावासाठी चेन्नईकडे ४३.४० कोटी रक्कम शिल्लक असून त्यांना ९ खेळाडू घेण्याची मुभा आहे. चेन्नईने १६ खेळाडू या हंगामासाठी कायम राखले आहेत. त्यामध्ये धोनी, ऋतुराज गायकवाड, अंशुल कंबोज, गुर्जापनीत सिंग, जेमी ओव्हर्टन, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रामकृष्ण घोष, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, खलिल अहमद, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, संजू सॅमसन यांचा समावेश आहे.

तसेच चेन्नईने रवींद्र जडेजा, सॅम करन, आंद्रे सिद्धार्थ, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, राहुल त्रिपाठी, शेख रशीद, वंश बेदी, विजय शंकर या खेळाडूंना संघातून काढले आहे. त्यामुळे चेन्नईला लिलावत फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवर अधिक लक्ष द्यावे लागणार असून ते अनेक खेळाडूंच्या मागे धावताना दिसतील.

ट्रेड विंडो अद्याप सुरू

अन्य संघांतून खेळाडूंची अदलाबदल म्हणजेच ट्रेड करण्याची विंडो अद्याप सुरू आहे. आयपीएलच्या ऑक्शनपूर्वी एका आठवड्यापर्यंत फ्रँचायझी मालकांना खेळाडूंची अदलाबदल करता येऊ शकते. तसेच ऑक्शन झाल्यावरही ते स्पर्धा सुरू होण्याच्या एका महिन्यापूर्वी खेळाडू बदलू शकतात. मात्र २०२६च्या ऑक्शनमध्ये घेतलेल्या खेळाडूंना संघमालक बदलू शकत नाहीत. जे खेळाडू आता संघाचा भाग आहेत, त्यांनाच फक्त पूर्णपणे रोख रकमेत किंवा अन्य खेळाडूसह अदलाबदल करून ट्रेड करता येऊ शकते.

१६ डिसेंबर रोजी ऑक्शन

आयपीएलच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे खेळाडूंचे मिनी ऑक्शन म्हणजेच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी ऑक्शन भारताबाहेर होणार आहे. यापूर्वी २०२४मध्ये दुबई, तर २०२५मध्ये जेद्दाह येथे ऑक्शन झाले होते. एका दिवसासाठीच हे ऑक्शन असेल. ग्लेन मॅक्सवेल, आंद्रे रसेल, मथीशा पाथिराना, कॅमेरून ग्रीन यांसारखे खेळाडू ऑक्शनच्या रिंगणात उतरतील.

logo
marathi.freepressjournal.in