जेतेपदासह सुमितची लक्षवेधी झेप, जागतिक एकेरी टेनिस क्रमवारीत प्रथमच अव्वल १०० खेळाडूंत स्थान

भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागलने सोमवारी चेन्नई ओपन चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
जेतेपदासह सुमितची लक्षवेधी झेप, जागतिक एकेरी टेनिस क्रमवारीत प्रथमच अव्वल १०० खेळाडूंत स्थान

चेन्नई : भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागलने सोमवारी चेन्नई ओपन चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. याबरोबरच २६ वर्षीय सुमितने कारकीर्दीत प्रथमच जागतिक एटीपी टेनिस क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंत स्थान मिळवले.

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या सुमितने चेन्नई ओपनच्या अंतिम फेरीत इटलीच्या लुका नार्डीला ६-१, ६-४ अशी धूळ चारून पुरुष एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. त्याचे हे कारकीर्दीतील पाचवे चॅलेंजर जेतेपद ठरले. तसेच त्याने संपूर्ण स्पर्धेत एकही सेट गमावला नाही. स्पर्धेपूर्वी १२१व्या स्थानी असलेल्या सुमितने आता ९८वा क्रमांक मिळवला आहे. यासह प्रज्ञेश गुणेश्वरननंतर प्रथमच भारताचा एखादा टेनिसपटू एकेरीत अव्वल १०० खेळाडूंत स्थान मिळवले. प्रज्ञेशने २०१९मध्ये अशी कामगिरी केली होती.

प्रत्येक टेनिसपटूचे क्रमवारीत आघाडीच्या १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न असते. घरच्या प्रेक्षकांसमोर ही स्पर्धा जिंकून क्रमवारीत आगेकूच करणे फारच अभिमानाची बाब आहे. गेले काही महिने माझ्या कारकीर्दीला कलाटणी देणारे ठरले.

- सुमित नागल

logo
marathi.freepressjournal.in