तळाचे स्थान टाळण्यासाठी चेन्नई-राजस्थानमध्ये झुंज

आयपीएलमध्ये मंगळवारी रंगणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. या लढतीद्वारे दोन्ही संघ तळाचे स्थान टाळण्यासाठी प्रयत्न करतील.
तळाचे स्थान टाळण्यासाठी चेन्नई-राजस्थानमध्ये झुंज
Published on

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये मंगळवारी रंगणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. या लढतीद्वारे दोन्ही संघ तळाचे स्थान टाळण्यासाठी प्रयत्न करतील.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने १२ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवले आहेत. ९ पराभवांमुळे यंदा चेन्नईवर गुणतालिकेत अखेरीस राहण्याची नामुष्की ओढवू शकते. तसेच सलग दोन हंगामात चेन्नईला बाद फेरी गाठता आलेली नाही. मात्र गेल्या काही सामन्यांत चेन्नईने युवा खेळाडूंना संधी देत काहीसा जम बसवला आहे. मुंबईकर आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस या युवा फलंदाजांनी चमक दाखवली. गोलंदाजीत खलिल अहमद व फिरकीपटू नूर अहमद यांनीच आतापर्यंत छाप पाडली आहे. मात्र रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंचे अपयश चेन्नईला महागात पडले आहे. चेन्नईने गेल्या सामन्यात कोलकाताला धूळ चारली. त्यामुळे आता मंगळवारी आणखी एक विजय नोंदवून ते अखेरचे स्थान टाळू शकतात.

दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. तब्बल पाच सामन्यांत राजस्थानने धावांचा पाठलाग करताना हातातील विजय गमावला. गेल्या लढतीत पंजाबविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ८९ धावा फटकावूनही राजस्थानला २२० धावांचा पाठलाग करता आला नाही. तसेच दोन वेळेस तर ६ चेंडूंत फक्त ९ धावा करण्यात त्यांना अपयश आले. आता मंगळवारी राजस्थानचा संघ अखेरची लढत खेळणार आहे.

यशस्वी जैस्वाल व वैभव सूर्यवंशी ही सलामी जोडी उत्तम लयीत आहे. मात्र मधल्या फळीत सॅमसन, रियान पराग संघर्ष करत आहे. तसेच ध्रुव जुरेल व शिम्रॉन हेटमायर लढत जिंकवून देऊ शकलेले नाहीत. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर छाप पाडत असला तरी अन्य गोलंदाज मात्र अपयशी ठरले आहेत. फिरकीपटू महीष थिषणा व वानिंदू हसरंगा यांनीही निराशा केलेली आहे.

प्रतिस्पर्धी संघ -

  • चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल.

  • राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.

16-14

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३० सामन्यांपैकी चेन्नईने १६, तर राजस्थानने १४ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये कमालीचे द्वंद्व असल्याचे स्पष्ट होते. पहिल्या टप्प्यातील लढतीत राजस्थानने चेन्नईला नमवले होते. त्यामुळे चेन्नई परतफेड करण्यास सज्ज असेल.

  • वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in