इरिगसी दुसऱ्या स्थानी; विन्सेंट केमरची आघाडी कायम

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन इरिगसी याने शनिवारी अमेरिकन ग्रँडमास्टर रे रॉबसनला पराभूत करत चेन्नई ग्रँडमास्टर स्पर्धेत तिसऱ्या फेरीनंतर एकट्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
इरिगसी दुसऱ्या स्थानी; विन्सेंट केमरची आघाडी कायम
Photo : X
Published on

चेन्नई: जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन इरिगसी याने शनिवारी अमेरिकन ग्रँडमास्टर रे रॉबसनला पराभूत करत चेन्नई ग्रँडमास्टर स्पर्धेत तिसऱ्या फेरीनंतर एकट्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

राऊंड रॉबीन पद्धतीने होणाऱ्या मास्टर कॅटेगरीत अजून ६ फेऱ्या होणार आहेत. इरिगसीकडे २.५ गुण आहेत. दरम्यान जर्मनीच्या विन्सेंट केमरने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. आणखी एक विजय मिळवत त्याच्या खात्यात ३ गुण आहेत. यावेळी त्याने कार्तिकेयन मुरलीला पराभूत केले.

भारताचा आणखी एक ग्रँडमास्टर विदीत गुजराथीने मोक्याच्या क्षणी योग्य चाली खेळत त्याचा देश सहकारी असलेल्या निहाल सारीनवर रोमहर्षक विजय मिळवला. दरम्यान अमेरिकन ग्रँडमास्टर अवॉन्डर लिआंगने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. डच ग्रँडमास्टर जॉर्डन व्हॅन फॉरेस्टला धक्का देत अमेरिकन ग्रँडमास्टरने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

युवा बुद्धिबळपटू व्ही. प्रणवने अव्वल मानांकित अनिष गिरीला बरोबरीत रोखत क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले. प्रणव हा स्पर्धेतील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे.

चॅलेंजर्स विभागात भारताचे अभिमन्यू पुराणिक आणि एम. प्रणेश यांनी दमदार कामगिरी करत अनुक्रमे हर्षवर्धन जी.बी. आणि पी. इनियन यांच्यावर विजय मिळवला. या दोघांनी २.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर झेप घेतली आहे.

त्याचबरोबर लिओन ल्युक मेंडोंका याने आर. वैष्णवी हिचा पराभव केला, तर अधिबन भास्करन आणि डी. हरिका यांच्यात सामना बरोबरीत सुटला. आर्यन चोप्रा आणि दिप्तायन घोष यांच्यातील लढतही अनिर्णित राहिली.

मास्टर्स गटात काही थरारक सामने पाहायला मिळाले. व्हिन्सेंट केमरने कार्तिकेयन मुरलीचा पराभव केला, तर अर्जुन इरिगसीने रे रॉब्सनवर मात केली. अवॉन्डर लियांगने जोर्डन व्हॅन फॉरेस्टचा पराभव करत चांगली कामगिरी बजावली. व्ही. प्रणव आणि अनुभवी खेळाडू अनीश गिरी यांच्यात सामना बरोबरीत सुटला. दुसरीकडे, विदित गुजराथीने निहाल सरीनवर विजय मिळवला.

चॅलेंजर्स गटात भारतीय खेळाडूंमध्ये काही चुरशीची लढती पाहायला मिळाल्या. अभिमन्यू पुराणिकने हर्षवर्धन जी.बी. याचा पराभव केला, तर एम. प्रणेशने पी. इनियानविरुद्ध विजय मिळवला. अधिबान भास्करन आणि महिला ग्रँडमास्टर डी. हरिका यांच्यातील

सामना बरोबरीत सुटला. लिऑन ल्यूक मेंडोंका याने आर. वैशालीवर मात केली. आर्यन चोप्रा आणि दिप्तयान घोष यांच्यातील लढत अनिर्णीत राहिली.

दरम्यान चेन्नई ग्रँडमास्टर ही स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे तशा काही रोमांचक लढती पाहायला मिळत आहेत. मास्टर्स आणि चॅलेंजर्स अशा दोन्ही गटांत स्पर्धा अधिक रोमांचक होत आहेत. मास्टर्स गटात विन्सेंट केमर अव्वल स्थानी कायम आहे.

मास्टर्स गुणतालिका (तिसऱ्या फेरीनंतर)

  • विन्सेंट केमर - ३

  • अर्जुन इरिंगसी - २.५

  • रे रॉब्सन, अवॉन्डर लियांग, अनिश गिरी, विदित गुजराथी -प्रत्येकी १.५

  • जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट, व्ही. प्रणव, कार्तिकेयन मुरली - प्रत्येकी १

  • निहाल सरीन - ०.५

चॅलेंजर्स विभागातील गुणतालिका (तिसऱ्या फेरीनंतर):

  • एम. प्रणेश - २.५

  • अभिमन्यू पुराणिक - २.५

  • दिप्तायन घोष - २

  • लिओन ल्युक मेंडोंका - २

  • अधिबन भास्करन- १.५

  • पी. इनियन - १.५

  • आर. वैष्णवी - १

logo
marathi.freepressjournal.in