Sinquefield Cup 2025 : गुकेशचा पहिला विजय; प्रज्ञानंद अग्रस्थानी

गुकेशला मंगळवारी पहिल्या फेरीत भारताच्याच आर. प्रज्ञानंदकडून पराभव पत्करावा लागला होता.
Sinquefield Cup 2025 : गुकेशचा पहिला विजय; प्रज्ञानंद अग्रस्थानी
Published on

सेंट लुईस : अमेरिका येथे सुरू असलेल्या सिंकेफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या जगज्जेत्या डी. गुकेशने बुधवारी गुणांचे खाते उघडले. पहिल्या फेरीत पराभव पत्करणाऱ्या गुकेशने दुसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्रोव्हला धूळ चारली.

गतवर्षी वयाच्या १८व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणाऱ्या गुकेशला मंगळवारी पहिल्या फेरीत भारताच्याच आर. प्रज्ञानंदकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र दुसऱ्या फेरीत गुकेशने लौकिकाला साजेसा खेळ केला. आता अजून सात फेऱ्या शिल्लक असून गुकेश एका गुणासह चौथ्या स्थानी आहे.

दरम्यान, पज्ञानंदने दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले. त्यामुळे प्रज्ञानंद आता १.५ गुणांसह संयुक्तपणे अग्रस्थानी आहे. लेवॉन अरोनियन व फिरोझा यांचेही प्रत्येकी १.५ गुण आहेत. १० खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत विजेत्याला ३ लाख ७५ हजार अमेरिकन डॉलर इतके बक्षीस दिले जाणार आहे. गुकेश व प्रज्ञानंद असे दोन भारतीय या स्पर्धेचा भाग आहेत.

ऑक्टोबरमध्ये आनंद, कार्लसन, कास्पारोव्ह येणार आमनेसामने

ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या क्लच बुद्धिबळ स्पर्धेतील प्रदर्शनीय सामन्यांसाठी भारताचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदला आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी आनंदची त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी रशियाच्या गॅरी कास्पारोव्हशी गाठ पडेल. तसेच भारताचा जगज्जेता गुकेश मॅग्नस कार्लसनशी दोन हात करेल. या दोघांमधील यापूर्वीची लढत रंगतदार झाली होती. त्यामुळे या सामन्यांकडे लक्ष लागून असून बुद्धिबळप्रेमींना पर्वणी मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in