बुद्धिबळातील जगज्जेतेपदाचा महासंग्राम! जागतिक अजिंक्यपद लढतीत आजपासून भारताचा डी. गुकेश चीनच्या डिंग लिरेनशी भिडणार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी रणसंग्राम आटोपल्यानंतर आता सिंगापूरमध्ये बुद्धिबळाच्या जगज्जेतेपदाचा महासंग्राम सुरू होणार आहे. विश्वनाथन आनंदनंतर भारताचा बुद्धिबळातील जगज्जेता कोण, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. भारताचा युवा दोम्माराजू गुकेश आणि चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यात सोमवारपासून बुद्धिबळातील जगज्जेतेपदाची लढत रंगणार आहे.
डी. गुकेश,डिंग लिरेन (डावीकडून)
डी. गुकेश,डिंग लिरेन (डावीकडून)
Published on

सिंगापूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी रणसंग्राम आटोपल्यानंतर आता सिंगापूरमध्ये बुद्धिबळाच्या जगज्जेतेपदाचा महासंग्राम सुरू होणार आहे. विश्वनाथन आनंदनंतर भारताचा बुद्धिबळातील जगज्जेता कोण, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. भारताचा युवा दोम्माराजू गुकेश आणि चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यात सोमवारपासून बुद्धिबळातील जगज्जेतेपदाची लढत रंगणार आहे.

बुद्धिबळात एकापेक्षा सरस डावपेच आखणाऱ्या १८ वर्षीय गुकेशच्या पाठीशी बहुतांशी बुद्धिबळजगत असले तरी जवळपास १५ दिवस रंगणाऱ्या या लढतीत लिरेन कोणत्याही क्षणी आपल्या भात्यातील अस्त्रे बाहेर काढून गुकेशला नामोहरम करू शकतो. त्यामुळेच लिरेनला सहजासहजी घेण्याची चूक गुकेशला महागात पडू शकते. २०२३मध्ये रशियाच्या इयान नेपोपनियाची याला पराभूत करून लिरेनने जगज्जेतेपदाचा मुकुट परिधान केला. मात्र त्यानंतर चीनच्या लिरेनला मानसिक आजारांनी ग्रासले. गेल्य वर्षभरात गुकेशपेक्षा मोजक्याच स्पर्धांमध्ये खेळल्यामुळे लिरेनच्या ताकदीचा अंदाज गुकेशला घेणे कठीण झाले आहे.

“माझी भूमिका एकदम स्पष्ट असून मला प्रत्येक डावादरम्यान माझ्याकडून सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वेळी पटावरील त्या-त्या परिस्थितीत चांगल्या चाली चालाव्या लागतील. जर मी चांगली कामगिरी करू शकलो तर नक्कीच विजेतेपदाचे स्वप्न साकार करू शकेन. प्रतिस्पर्धी डिंग लिरेनचा सध्याचा फॉर्म खराब असो वा तो चांगली कामगिरी करो, मला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही,” असे गुकेशने सांगितले.

या स्पर्धेच्या १३८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आशिया खंडातील दोन बुद्धिबळपटूंमध्ये जगज्जेतेपदाची लढत होत आहे. जगज्जेतेपदाचा किताब जिंकणाऱ्या खेळाडूला २.५ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे बक्षीसही मिळणार आहे. वर्षभरापूर्वी गुकेश हा जगज्जेतेपदाच्या लढतीतील आव्हानवीर असेल, असे कुणालाही वाटले नव्हते. “मी फार शांत आणि संयमी आहे, असे मला वाटत नाही. ही खूप मोठी स्पर्धा असल्याने मी जरा जास्तच उत्सुक आहे. मात्र मी कोणताही अडथळा पार करू शकतो, याची खात्री आहे. माझ्या कर्तृत्वावर, कौशल्यगुणांवर माझा विश्वास असल्यामुळे मला काळजी करण्याची गरज वाटत नाही,” असे गुकेशने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

गुकेश हा या जगज्जेतेपदाच्या लढतीतील फेव्हरिट समजला जात असला तरी लिरनेच्या मते, ही लढत रंगतदार होईल, यात शंका नाही. “गुकेश हा युवा खेळाडू असून त्याने विविध आघाड्यांवर चांगला खेळ केला आहे. जर आम्ही दोघांनी आमचा सर्वोत्तम खेळ केला तर बुद्धिबळ चाहत्यांना ही लढत म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे,” असे ३२ वर्षीय लिरेनने सांगितले.

२०१३मध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदने अखेरचे जगज्जेतेपद पटकावले होते. पाच वेळा जगज्जेत्या आनंदला नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला होता. आता गुकेशला भारताचा हा दुष्काळ संपवण्याची संधी मिळणार आहे. आनंद हा भारताचा एकमेव जगज्जेता असला तरी आता गुकेशनेही त्याच्याच पावलावर पाऊल टाकावे, अशी आनंदची इच्छा आहे. चेन्नईमधील आनंदच्या अकादमीत गुकेश घडला असून गुकेश जगज्जेता झाला, तर आनंदनंतर जगज्जेतेपद पटकावणारा तो भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरणार आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेशची जगज्जेतेपदासाठी निवड झाली, त्यानंतर गुकेशचा प्रवास थक्क करणारा आहे. कँडिडेट्स म्हणजेच आव्हानवीराच्या स्पर्धेत अमेरिकेचे फॅबियानो कारुआना आणि अमेरिकेचाच हिकारू नाकामुरा तसेच इयान नेपोमनियाची हे विजेतेपदाच्या शर्यतीत होते. मात्र गुकेशने या सर्वांनाच मात देत कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकत बुद्धिबळजगताला आश्चर्याचा धक्का दिला. या स्पर्धेत भारताचे आर. प्रज्ञानंद, विदीत गुजराथी हे खेळाडूसुद्धा रिंगणात होते.

क्लासिकल डावांमध्ये गुकेशला अद्याप लिरेनविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. लिरेनने गुकेशविरुद्ध दोन विजय आणि एक बरोबरी पत्करली आहे. लिरेनचा गुकेशवरील शेवटचा विजय हा या वर्षीच्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील होता. याआधी त्याने गुकेशला याच स्पर्धेत २०२३ सालीही पराभूत केले आहे.

गुकेशच्या क्रमवारीत वाढ

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यानंतर गुकेशच्या रेटिंग गुणांमध्ये ३७ गुणांची वाढ झाली असून तो २७८३ गुणांसह जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच वेळी लिरेनच्या रेटिंग गुणांमध्ये ५२ गुणांची घट झाली आहे. सहा वर्षांपूर्वी २८१६ गुणांसह जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला लिरेन आता २७२८ गुणांसह थेट २३व्या स्थानी पोहोचला आहे.

वेळ : दुपारी २.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : चेस.कॉम आणि फिडेच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर.

logo
marathi.freepressjournal.in