
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लने जिंकला आहे. भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवार आणि बुधवार या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या. यामुळे टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यात कार्लसनने बाजी मारली आहे. प्रज्ञानानंदनाचा पराभव जरी झाला असला तरी त्याने कार्लसनला कडवी झुंज दिली.
२५-२५ मिनिटांचे दोन सामने खेळवून टायब्रेकरमध्ये विजेता ठरवण्यात येतो. यात कार्लसनने पहिला सामना जिंकला होता. त्यामुळे प्रज्ञानानंदला दुसरा सामान जिंकणं अनिवार्य होतं. मात्र पहिला सामना जिंकून आत्मविश्वास बळावलेल्या कार्लसनने खेळ आणखी उंचावला. प्रज्ञानानंदने देखील त्याला कडवी झुंज दिली. मात्र दुसरा सामना हा अनिर्णित राहिला. यामुळे कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वकप विजेता झाला.
तब्बल २१ वर्षांनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याची संधी भारतीय खेळाडूला होती. मात्र, प्रज्ञानानंदने दिलेली झुंज अपयशी ठरली. २००२ साली विश्वनाथन आनंदने ही स्पर्धा जिंकली होती. मात्र १८ वर्षीय प्रज्ञानानंदाने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे त्याचं सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.