
नवी दिल्ली : एकेकाळी भारताच्या कसोटी संघातील भरवशाचा फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवलेल्या चेतेश्वर पुजाराने रविवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. ३७ वर्षीय पुजाराने २०१० ते २०२३ या काळात १०३ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर अखेर २०२५मध्ये क्रिकेटला अलविदा केला.
गेल्या वर्षभरात भारतीय क्रिकेटमध्ये निवृत्तीचे वारे वाहत आहेत. जानेवारीत फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, तर मे महिन्यात रोहित शर्मा, विराट कोहली या तारांकित फलंदाजांनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. आता २५ वर्षीय युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारत नव्याने संघबांधणी करत आहे. तसेच पुजाराला अखेरचा कसोटी सामना खेळून २ वर्षे उलटली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जून २०२३मध्ये जागतिक अजिंक्यपद लढतीच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) निमित्ताने तो अखेरचा सामना खेळला. त्यानंतर तो रणजी स्पर्धा व इंग्लंडमध्ये कौंटी स्पर्धेत खेळताना दिसला. मात्र त्याची भारतीय संघात परतण्याची शक्यता तशी मावळलीच होती. अखेरीस रविवारी पुजाराने क्रिकेट कारकीर्द थांबवण्याचा निर्णय घेतला. ट्विटरवर त्याने निवृत्ती जाहीर केल्यावर पत्नी पूजासह पत्रकार परिषदही घेतली.
“भारताची जर्सी परिधान करणे, राष्ट्रगीत गाणे व मैदानात उतरल्यावर प्रत्येक वेळी स्वत:चे सर्वोत्तम योगदान देण्याचा अनुभव मी शब्दांत मांडू शकत नाही. मात्र जसे म्हटले जाते, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा कधी ना कधी शेवट होतोच. त्यामुळेच कृतज्ञतेची जाणीव ठेवून मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही दिलेल्या प्रेम व पाठबळासाठी मनापासून धन्यवाद,” असे पुजाराने ट्वीट केले.
त्याशिवाय पुजाराने राजकोट येथून सुरू झालेल्या त्याच्या प्रवासात ज्यांनी सहाय्य केले, त्या सर्वांचेही आभार मानले. बीसीसीआय, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांचे आपण ऋणी राहू. तसेच कुटुंब, पत्नी पूजा व मुली आदिती यांनी कठीण काळात आपल्याला साथ दिल्याचेही पुजाराने निवृत्तीच्या संदेशात म्हटले. नुकताच झालेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत पुजारा समालोचनाच्या भूमिकेत दिसला. त्यामुळे यापुढेही तो समालोचन व प्रशिक्षणाच्या दृष्टीने क्रिकेटशी जवळ राहू शकतो.
ऑक्टोबर २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पुजाराने १०३ कसोटींत ४३च्या सरासरीने ७,१९५ धावा केल्या. यामध्ये १९ शतकांचा समावेश आहे. सौराष्ट्रसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या पुजाराने २७८ लढतींमध्ये ६६ शतकांसह २१,३०१ धावा केल्या. पुजाराने ५ एकदिवसीय सामन्यांतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जून २०१४मध्ये बांगलादेशविरुद्ध तो अखेरचा सामना खेळला व त्यानंतर त्याने एकदिवसीय संघातील स्थान गमावले. २०२५मध्ये रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत गुजरातविरुद्ध पुजारा खेळला होता. हाच त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरला.
‘द वॉल’ राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर एका तपासाठी पुजारा कसोटी संघातील तिसऱ्या क्रमांकावर भारताची भिंत म्हणून सक्षमपणे उभा होता, असे म्हणू शकतो. त्याने कसोटीत तीन द्विशतकेही साकारली. पुजाराच्या स्ट्राइक रेटविषयी नेहमीच चर्चा व्हायची. २०२२पासून पुजाराची कामगिरीही खालावली. त्याला एक अर्धशतक झळकावण्यासाठी १ हजारहून अधिक दिवस प्रतीक्षा करावी लागली. अखेरीस २०२३च्या डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. पुजाराही त्या सामन्यात अपयशी ठरला. मग त्याने भारतीय संघातील स्थान गमावले. मात्र भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्याचे नाव आदराने घेतले जाईल.
दिग्गजांकडून मानवंदना
"पुजारा तुला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहून नेहमी आश्वस्त वाटायचे. तू संघात नेहमी स्थैर्य व विश्वासाची भावना निर्माण केलीस. कसोटी क्रिकेटसाठी तू दिलेले योगदान नेहमी स्मरणात राहील. तुझी झुंजार वृत्ती व दडपणाखाली उंचावलेली कामगिरी वाखाणण्याजोगी होती. २०१८चा ऑस्ट्रेलिया दौरा तुझ्यामुळे नेहमीच स्मरणात राहील. तुझ्या पुढील आयुष्यासाठी व नव्या इनिंगसाठी शुभेच्छा." - सचिन तेंडुलकर
"पुजारा हा एक लढवय्या होता. माझ्या प्रशिक्षण कारकीर्दीत भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. तसेच पाच वर्ष संघ क्रमवारीत अग्रस्थानी राहिला. यामध्ये पुजाराचा सिंहाचा वाटा होता. वेल डन पुजी." - रवी शास्त्री
"जेव्हा संघ कठीण परिस्थितीत अथवा पराभवाच्या छायेत असायचा, तेव्हा पुजारा नेहमी उभा राहायचा. यशस्वी कारकीर्दीबद्दल तुझे अभिनंदन." - गौतम गंभीर
"जेव्हापासून पुजाराला खेळताना पाहिले, तेव्हापासून मी त्याच्या ध्यैर्याचा चाहता आहे. गॅबा येथील कसोटीत त्याने अंगावर चेंडूंचा मारा झेलून साकारलेली खेळी संस्मरणीय होती. तू देशासाठी सर्वकाही अर्पण करण्यास तयार होता. तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा." - व्हीव्हीएस लक्ष्मण
"पुजाराने नेहमीच देशासाठी तन आणि मन अर्पून खेळ केला. तुला फार शुभेच्छा पुजी. लवकरच भेटू." - युवराज सिंग