

नवी दिल्ली : भारताची तारांकित पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शानदार पुनरागमन करत चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ७५० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत २०२३ व २०२५मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यावर अखेर तिसऱ्या प्रयत्नात सात्विक-चिरागने बाजी मारली.
रविवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात २९ वर्षीय चिराग व २६ वर्षीय सात्विक यांच्या जोडीने चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू या जोडीचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. एक तास, १० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी जबरदस्त पुनरागमन करत जेतेपदावर नाव कोरले. टिंग व रेन यांची जोडी जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. मात्र सात्विक-चिराग या पाचव्या क्रमांकावर असलेल्या जोडीने दडपणाखाली खेळ उंचावला.
या मोसमातील भारतीय जोडीचे हे दुसरे विजेतेपद आहे. त्यांना ८७ लाख, यापूर्वी त्यांनी मे महिन्यात सिंगापूर ओपन सुपर ७५० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तसेच थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली होती. आता १९ सप्टेंबरपासून जपानमध्ये सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या सुवर्णपदकाचा बचाव करण्यासाठी उतरणाऱ्या सात्विक-चिरागसाठी हे विजेतेपद मोठे प्रोत्साहन देणारे ठरेल.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून सात्विक आणि चिरागने सर्व्हिसऐवजी बाजू निवडली. पहिल्या गेममध्ये चीनी जोडीने आक्रमक सुरुवात करत ५-० अशी आघाडी घेतली आणि भारताच्या पकडीतून सामना बाहेर नेला. चिरागची सर्व्हिस फॉल्ट आणि वाईट फटक्यांमुळे चीनने पहिला गेम २१-११ असा सहज जिंकला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने आपल्या बचावात सुधारणा केली. सात्विकने फ्लिक सर्व्हिसचा वापर करत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले. ४५ फटक्यांची रॅली जिंकत भारतीय जोडीने १२-८ अशी भक्कम आघाडी घेतली आणि अखेर दुसरा गेम २१-१३ असा जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक तिसऱ्या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. चिनी जोडीने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली होती, परंतु सात्विक-चिरागने सलग गुण घेत १६-१६ अशी बरोबरी केली. मोक्याच्या क्षणी चिरागने मारलेल्या स्मॅशच्या जोरावर हा गेम २१-१७ असा जिंकत भारतीय जोडीने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
सात्विक-चिराग यांनी कारकीर्दीतील ११वे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद काबिज केले.
सात्विक-चिरागचे हे वर्षातील दुसरे जेतेपद ठरले. सिंगापूर ओपनमध्येही त्यांनी बाजी मारली होती.
आता लक्ष्य एशियाड
"येथे खेळणे नेहमीच चांगले वाटते. यावेळी आम्ही दुखापतीतून परतल्यानंतर खेळत आहोत, त्यामुळे या जेतेपदाने आम्हाला खूप आत्मविश्वास दिला. पहिल्या फेरीचा अपवाद वगळता, आम्ही खेळलेल्या सर्व सामन्यांत तीन गेम्स झाले. वर्षातील दुसरे जेतेपद पटकावल्याचा आनंद आहे. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्ण जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे," असे सात्विक म्हणाला. "हे जेतेपद खरोखरच खास वाटते. साहजिकच, आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी एखादे विजेतेपद जिंकल्याने मोठा आत्मविश्वास मिळतो की, आम्ही ज्या दिशेने प्रयत्न करत आहोत ती योग्य आहे. आता घरी परतून काही दिवसांच्या विश्रातीनंतर आशियाई स्पर्धेच्या तयारीला लागू," असे जेतेपदानंतर चिराग म्हणाला.