प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचा ‘फिडे’कडून गौरव

अभिजित कुंटे यांनी भारतीय महिला बुद्धिबळ संघाला भरीव यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचा ‘फिडे’कडून गौरव

मुंबई : भारताचे माजी आंतरराष्ट्रीय नामवंत बुद्धिबळ खेळाडू, प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) १५व्या ‘फिडे ट्रेनर’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. जागतिक बुद्धिबळ खेळात खास करून त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणाची आणि योगदानाची दखल घेऊन फिडेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. त्यांना प्रतिष्ठीत वख्तांग कारसेलाडझे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

अभिजित कुंटे यांनी भारतीय महिला बुद्धिबळ संघाला भरीव यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने २०२१च्या जागतिक स्पर्धेत आणि २०२२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. तसेच ४४व्या चेस ऑलिंपियाडमध्ये भारतीय महिला संघाने कांस्यपदक मिळवले होते. भारतीय महिला संघाने या तिनही स्पर्धेत पहिल्यांदाच पदके जिंकून नवा इतिहास भारतीय महिला बुद्धिबळामध्ये रचला.

भारतीय महिला संघाला एवढे मोठे यश मिळवून देणारे अभिजित कुंटे हे चौथे ग्रँडमास्टर आहेत. भारतीय महिला संघाच्या यशात त्यांचे प्रेरणात्मक आणि धोरणात्मक मार्गदर्शन निश्चितपणे यशस्वी ठरले. २०२२ मध्ये आशियाई बुद्धिबळ महासंघाने त्यांना वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून गौरविले होते. आता फिडेच्या ट्रेनर पुरस्कारामुळे त्यांच्या बुद्धिबळ कारकीर्दीत आणखी मोठी भर पडली आहे. फिडेच्या ट्रेनर पुरस्कार निवड समितीमध्ये लिएम (व्हिएतनाम), अकोपियन (अमेरिका), अमिन (इजिप्त), मारीन (रुमानिया) या दिग्गज प्रशिक्षकांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in