रोहितचे भवितव्य त्याच्याच हाती; हार्दिक दुर्दैवी! MI च्या निराशाजनक हंगामानंतर प्रशिक्षक मार्क बाऊचरकडून विविध मुद्द्यांवर भाष्य

रोहित शर्माच्या भवितव्याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे. सध्या त्याचे लक्ष्य फक्त आगामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे.
रोहितचे भवितव्य त्याच्याच हाती; हार्दिक दुर्दैवी! MI च्या निराशाजनक हंगामानंतर प्रशिक्षक मार्क बाऊचरकडून विविध मुद्द्यांवर भाष्य
Published on

ऋषिकेश बामणे/मुंबई

रोहित शर्माच्या भवितव्याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे. सध्या त्याचे लक्ष्य फक्त आगामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे. पुढील हंगामापर्यंत काहीही होऊ शकते, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने व्यक्त केली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी झालेल्या अखेरच्या साखळी लढतीतही मुंबईला पराभव पत्करावा लागल्यानंतर बाऊचरने विविध मुद्द्यांवर भाष्य करताना हार्दिकची पाठराखणही केली. तसेच चाहत्यांना संघ तसेच संघातील खेळाडूंच्या पाठीशी राहण्याची विनंती केली.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईला यंदाच्या आयपीएलमध्ये १४ पैकी फक्त ४ सामनेच जिंकता आले. त्यामुळे मुंबईला तळाच्या म्हणजेच १०व्या स्थानी समाधान मानावे लागले. २०२२नंतर दुसऱ्यांदा मुंबईवर तळाशी राहण्याची वेळ ओढवली. संपूर्ण हंगामात रोहित विरुद्ध हार्दिक असाच वाद कायम राहिल्याने संघात एकता दिसून आली नाही. त्याशिवाय चाहत्यांनीही हार्दिकला सातत्याने लक्ष केले. या सर्व बाबींचा निश्चितच मुंबईच्या कामगिरीवर परिणाम झाला. शुक्रवारी वानखेडेवर झालेल्या अखेरच्या सामन्यात रोहितने ३८ चेंडूंत ६८ धावांची खेळी साकारली. मात्र तरीही मुंबईला लखनऊकडून १८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. रोहितचा हा मुंबईसाठी अखेरचा सामना ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे या लढतीत हार्दिकने फलंदाजीत फक्त १६ धावा केल्या. तसेच तो मैदानावर आल्यावर चाहत्यांनी त्याची हुर्योसुद्धा उडवली.

“रोहितच्या भवितव्याविषयी आम्ही काहीही चर्चा केली नाही. सामन्याच्या एक दिवस अगोदर मी संपूर्ण हंगामाचा आढावा घेण्याच्या हेतूने रोहितशी फक्त पुढे काय, असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने ‘टी-२० विश्वचषक’ असे उत्तर दिले. त्यामुळे सध्या तो फक्त विश्वचषकाचाच विचार करत आहे, हे स्पष्ट झाले. रोहित स्वत:च्या भवितव्याविषयी निर्णय घेण्यास सक्षम असून पुढील वर्षी मेगा-ऑक्शन असल्याने काहीही होऊ शकते,” असे बाऊचर म्हणाला.

“रोहितसाठी हा हंगाम दोन विभागांचा ठरला. चेन्नईविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याची कामगिरी खालावली. मात्र या लढतीत त्याने पुन्हा एकदा छाप पाडली. मुंबईसाठी त्याने यंदा सर्वाधिक ४१७ धावा केल्या. त्यामुळे फलंदाज म्हणून तो संघासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले,” असेही ४७ वर्षीय बाऊचरने स्पष्ट केले.

चाहत्यांच्या डिवचण्याचा हार्दिकवर परिणाम!

संपूर्ण हंगामात विविध स्टेडियम्समध्ये हार्दिकला चाहत्यांनी निशाणा केले. याचा त्याच्या मानसिकतेवर तसेच खेळावर नक्कीच परिणाम झाला, हे मान्य करावे लागेल. हार्दिकसारखी वेळ कुणावरही ओढवू नये, अशा शब्दांत बाऊचरने हार्दिकची पाठराखण केली.

हार्दिकने या हंगामात १४ सामन्यांत फक्त २१६ धावा केल्या. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याशिवाय गोलंदाजीत त्याने फक्त ११ बळी मिळवले. एखाद-दुसरी लढत वगळता हार्दिक संपूर्ण स्पर्धेत चाचपडताना दिसला. अनेकदा क्षेत्ररक्षणादरम्यान त्याची देहबोलीसुद्धा खालावलेली दिसली. रोहितकडून हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय चाहत्यांना न पटल्याने त्यांनी वानखेडेसह विविध ठिकाणी हार्दिकला लक्ष्य केले व त्याची हुर्यो उडवली.

“हार्दिकला पूर्ण हंगामात प्रेक्षकांनी ‘बू’ केले. त्याच्यासाठी मला नक्कीच वाईट वाटते. अशी वेळ कुणावरही ओढवू नये. हे सर्व व्यावसायिक क्रिकेटपटू असले तरी या गोष्टींचा खेळाडूवर परिणाम होतो. किंबहुना त्याचा संघाच्या कामगिरीवरही परिणाम जाणवला. हार्दिक हा भारताचा उत्तम अष्टपैलू आहे. मात्र संपूर्ण हंगामात त्याला स्वत:चा सर्वोत्तम खेळ दाखवता आला नाही. कदाचित त्याच्या डोक्यात असंख्य विचारांनी घर केले असावे. अशा वेळी खेळाडूची देहबोली खालावणे साहजिक आहे,” असेही बाऊचरने म्हटले.

“पुढील वर्षी तो नक्कीच यातून सावरत मुंबईचे नेतृत्व करू शकतो. एका खराब हंगामामुळे तो वाईट कर्णधार अथवा खेळाडू ठरत नाही. पुढील वर्षी मेगा-ऑक्शन कधी होईल. त्यादृष्टीने संघबांधणी करणे मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे,” असे बाऊचरने नमूद केले. डिसेंबरमध्ये आयपीएलच्या १८व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होऊ शकतो.

बाऊचरचे काय?

२०२३मध्ये बाऊचरने मुंबईचे प्रशिक्षकपद स्वीकारले. त्या हंगामात मुंबईने क्वालिफायर-२ पर्यंत मजल मारून तिसरे स्थान मिळवले. मात्र यंदा मुंबईला त्याच्या प्रशिक्षणाखाली अखेरच्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे बाऊचरला त्याच्या भवितव्याविषयी विचारले असता त्याने अद्याप याबाबत विचार केला नसल्याचे सांगितले. “पुढील काही दिवस आम्ही विविध मुद्द्यांवर चर्चा करू. मात्र माझ्याविषयी मी संघाच्या मालकांशी अद्याप संवाद साधलेला नाही. आम्हाला भावनिक होऊन नव्हे, तर कामगिरीच्या आधारे निर्णय घ्यावे लागतील,” असे बाऊचर म्हणाला.

हार्दिकवर एका सामन्याची बंदी

लखनऊविरुद्धच्या लढतीत षटकांची गती संथ राखल्याबद्दल मुंबईचा कर्णधार हार्दिकला ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. यामुळे पुढील वर्षी आयपीएलच्या पहिल्या लढतीला हार्दिकला मुकावे लागेल. त्याशिवाय संघातील खेळाडूंनाही प्रत्येकी १२ लाखांचा भुर्दंड भरावा लागेल. एखाद्या संघाने ३ वेळा निर्धारित वेळेत २० षटके पूर्ण न केल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते. हार्दिकडून आधीच दोन वेळा असे घडले होते. ऋषभ पंतलासुद्धा याचा बंगळुरूविरुद्धच्या लढतीत फटका बसला होता.

logo
marathi.freepressjournal.in