
पॅरिस : अमेरिकेची दुसरी मानांकित कोको गॉफने बेलारूसची अग्रमानांकित आर्यना सबालेंकाला अंतिम सामन्यात शनिवारी ७-६, २-६, ४-६ असे पराभूत करत फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पहिल्यांदाच पटकावले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत पहिला सेट पिछाडीवर पडूनही गॉफने सामन्यात पुनरागमन करून जेतेपदावर मोहर उमटवली.
पहिला सेट सबालेंकाने ७-६ असा खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये गॉफने शानदार पुनरागमन केले. तिने या सेटमध्ये २-० ने आघाडी घेतली. त्यानंतर सबालेंकाने बॅकहँडचा शानदार वापर करत पिछाडी कमी केली. गॉफने मात्र आक्रमक खेळ सुरूच ठेवला. अखेर हा सेट तिने ६-२ असा सहज खिशात घातला. सामना १-१ अशा बरोबरीत सुटल्यानंतर तिसऱ्या सेटने उत्सुकता वाढवली.
तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जीवतोड खेळ केला. गॉफने ३-१ ने आघाडी घेतली असली तरी ती फार काळ टिकली नाही. सबालेंकाने लागोपाठ दोन पाँईंट मिळवत हा सेट ३-३ असा बरोबरीत आणला.
त्यानंतर कोको गॉफने सामन्यावरची पकड मजबूत केली. तिने ६-४ ने हा सेट खिशात घालत सामना आपल्या बाजूने वळवला. या सामन्यातील विजयामुळे गॉफने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले.