

ग्लासगो : राष्ट्रकुल स्पर्धेत शुक्रवारचा दिवस भारताच्या पाचही बॉक्सर्ससाठी धडाकेबाज ठरला. प्रीती पवार, अरुंधती चौधरी, जास्मिन लंबोरिया, अंकुश पंघाल व जादुमणी सिंह यांनी आपापल्या वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. हे पाचही जण शनिवारी सुवर्णपदकासाठी दावेदारी सादर करतील.
महिलांच्या ७० किलो वजनी गटात अरुंधती चौधरीने वेल्सच्या गतविजेत्या रोझी एकल्सला पराभूत करत मोठा उलटफेर नोंदवला. तिच्यासह जास्मिन लंबोरिया (महिला ५७ किलो), प्रीती पवार (महिला ५४ किलो), अंकुश पांघाल (पुरुष ८० किलो) आणि जादुमणी सिंह (पुरुष ५५ किलो) यांनी आपापले उपांत्य सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अरुंधतीने ७० किलो गटातील अत्यंत अटीतटीच्या सामन्यात वेल्सच्या खेळाडूचा ४-१ असा पराभव केला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अरुंधतीने जोरदार मारा केल्याने पंचांना प्रतिस्पर्ध्याला स्टँडिंग काऊंट द्यावा लागला. महिलांच्या ५७ किलो गटात जास्मिनने लेसोथोच्या बॉक्सरचा दुखापतग्रस्त आणि एकतर्फी सामन्यात पराभव केला. दुसऱ्या फेरीच्या अखेरच्या सेकंदात प्रतिस्पर्ध्याला तिसरा स्टँडिंग काऊंट मिळताच पंचांनी सामना थांबवून (आरएससी) जास्मिनला विजयी घोषित केले. पुरुष व महिलांच्या अन्य सामन्यांमध्ये भारतीय बॉक्सर्सनी ५-० अशा एकतर्फी विजयांची नोंद केली.
पुरुषांच्या ५५ किलो गटात जादुमणी सिंहने नामिबियाच्या पी. पी. एम. हाओसेबवर ५-० अशी मात केली. महिलांच्या ५४ किलो गटात हरयाणाच्या भिवानी येथील २२ वर्षीय आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या प्रीतीने झांबियाच्या कॅथरीन म्वापेचा ५-० असा पराभव केला. आता सुवर्णपदकासाठी तिचा सामना कॅनडाच्या स्कार्लेट डेल्गाडोशी होईल. पुरुषांच्या ८० किलो गटात अंकुशने जोशुआ ओफोरीचा ५-० असा पराभव केला.
“मी जे नियोजन केले होते ते रिंगमध्ये उतरवता आले याचा आनंद आहे. सुवर्णपदकासाठी शनिवारी मला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. मी प्रतिस्पर्ध्याला कधीही हलक्यात घेत नाही आणि प्रशिक्षकांसोबत सविस्तर रणनीती आखते,” अशी प्रतिक्रिया प्रीतीने विजयानंतर दिली.
दरम्यान, ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली होती. आता फक्त स्पर्धेचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. उर्वरित दोन दिवसांत भारताच्या पदकसंख्येत जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारकडे लक्ष असेल.