Commonwealth Games 2026 : गुलवीरची रौप्यक्रांती! १० हजार मीटर शर्यतीत पदक जिंकणारा पहिला भारतीय

भारताचा २८ वर्षीय धावपटू गुलवीर सिंगने मंगळवारी मध्यरात्री ऐतिहासिक क्रांती घडवली.
Commonwealth Games 2026 : गुलवीरची रौप्यक्रांती! १० हजार मीटर शर्यतीत पदक जिंकणारा पहिला भारतीय
Commonwealth Games 2026 : गुलवीरची रौप्यक्रांती! १० हजार मीटर शर्यतीत पदक जिंकणारा पहिला भारतीय(Photo-X/@IA_SportsAdvntr)
Published on

ग्लासगो : भारताचा २८ वर्षीय धावपटू गुलवीर सिंगने मंगळवारी मध्यरात्री ऐतिहासिक क्रांती घडवली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारा तो पहिलाच धावपटू ठरला. गुलवीरने २७ मिनिटे ४९.७८ सेकंद अशी वेळ नोंदवून रौप्यपदक काबिज केले. अवघ्या एका सेकंदाच्या फरकाने त्याचे सुवर्ण हुकले. ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सनने २७ मिनिटे ४८.९३ सेकंदासह सुवर्ण पटकावले.

पावसाने ओल्या झालेल्या ट्रॅकवरही सक्षमपणे धावताना गुलवीरने संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावेल, अशी कामगिरी नोंदवली. ॲथलेटिक्समध्ये भारताला राष्ट्रकुल, आशियाई किंवा ऑलिम्पिक या स्पर्धांमध्ये फार कमी पदके मिळायची. त्यामुळेच गुलवीरने मिळवलेले हे यश संस्मरणीय ठरत आहे. यंदाच्या राष्ट्रकुलमधील अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचे हे दुसरे रौप्यपदक असून, यापूर्वी नाशिकच्या सर्वेश कुशारेने पुरुषांच्या उंच उडीत रौप्यपदक जिंकले होते.

ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, माऊंटेन बायकिंग, रग्बी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथलॉन यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नाहीत. भारताचे १२६ खेळाडू यावेळी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांतच भारताला पदकांची सर्वाधिक अपेक्षा आहे.

दरम्यान, राष्ट्रीय विक्रमवीर असलेल्या गुलवीरने २७ मिनिटे ४९.७८ सेकंद अशी वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या रॉबिन्सनने २७ मिनिटे ४८.९३ सेकंदांसह सुवर्णपदक पटकावले, तर आयल ऑफ मॅनच्या डेव्हिड मुलार्कीने २७ मिनिटे ५०.२८ सेकंदांसह कांस्यपदक जिंकले. स्कॉटस्टौन स्टेडियमवर मुसळधार पावसात पार पडलेल्या या शर्यतीत उत्तर प्रदेशच्या अत्रौली येथील लष्करी जवान असलेल्या गुलवीरने सुरुवातीपासूनच आघाडीच्या धावपटूंमध्ये स्थान कायम ठेवले आणि शेवटच्या टप्प्यात वेग वाढवत रौप्यपदकावर मोहर उमटवली.

“पदक जिंकल्याचा नेहमीच आनंद होतो. शर्यत चांगली झाली आणि पदक जिंकताना पाऊस किंवा उन्हाचा काही फरक पडत नाही. मी सर्व काही देवावर सोडले होते,” अशी प्रतिक्रिया आशियाई विजेत्या गुलवीरने दिली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर कुटुंबाशी बोललो नसल्याचे सांगताना तो म्हणाला की, “कुटुंबातील सदस्य सध्या झोपले असतील, मी त्यांना शर्यतीच्या दिवशी सांगत नाही. सध्या माझे लक्ष ५ हजार मीटर शर्यतीवर आहे.”

अमेरिकेत स्कॉट सिमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या गुलवीरने केनियाच्या डॅनिएल एबेन्योसारख्या बलाढ्य धावपटूंच्या उपस्थितीत रणनीती आखून धाव पूर्ण केली. १९८६च्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर पहिल्यांदाच पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत एकही आफ्रिकन धावपटू पदक विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही.

दरम्यान, महिलांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या पूजा सिंगला निराश व्हावे लागले. आशियाई विजेती असलेली १९ वर्षीय पूजा १.८२ मीटरची उंची पार करण्यात अपयशी ठरल्याने तिचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in