

ग्लासगो : शुक्रवार, ३१ जुलै २०२६ हा दिवस भारतातील ज्युदो क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने शुक्रवारी ज्युदोमध्ये दोन सुवर्णपदक पटकावली. अस्मिता डे, हर्ष सिंग यांनी हा पराक्रम केला. मुख्य म्हणजे आजवर राष्ट्रकुल, आशियाई किंवा ऑलिम्पिक अशा कोणत्याही स्पर्धेत भारताला ज्युदोमध्ये एकही सुवर्ण जिंकता आले नव्हते. त्यामुळेच अस्मिता व हर्षचे यश खास आहे.
ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली होती. आता फक्त स्पर्धेचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नसल्याने भारताच्या पदकसंख्येवर परिणाम होईल, असे भाकीत वर्तवले जात होते. १२६ खेळाडूंसह सहभागी झालेल्या भारताला वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांतूनच सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती. मात्र ज्युदोमध्ये मिळालेल्या या दोन सुवर्णपदकांनी भारताची पदकसंख्या आणखी उंचावली.
दरम्यान, शुक्रवारपासूनच ज्युदोच्या क्रीडा प्रकारांना प्रारंभ झाला. भारताची तुलिका मान डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्पर्धेबाहेर गेली होती. अशा स्थितीत अन्य ज्युदोपटूंकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र महिलांच्या ४८ किलो वजनी गटात त्रिपुराच्या २३ वर्षीय अस्मिताने चमकदार कामगिरी नोंदवली. अस्मिता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली ज्युदोपटू ठरली आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या हायडी क्वाचचा पराभव करत तिने हे ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर अस्मिताने दमदार पुनरागमन करत सोनेरी यश संपादन केले.
१९९० मध्ये ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोचा समावेश झाल्यापासून भारतीय ज्युदोपटूंनी प्रत्येक आवृत्तीत पदके जिंकली आहेत, परंतु भारताला कधीही अव्वल स्थान मिळवता आले नव्हते. अस्मिताने ही प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. अंतिम सामन्यात सुरुवातीला ‘युको’ गुण गमावल्यामुळे आणि पेनल्टी मिळाल्याने अस्मिता पिछाडीवर पडली होती. मात्र, तिने चार मिनिटांच्या या सामन्यात अत्यंत आक्रमक खेळ करत १-१ अशी बरोबरी साधली.
नियमीत वेळेत दोन्ही खेळाडूंना निर्णायक गुण मिळवता न आल्याने सामना ‘गोल्डन स्कोअर’ फेरीत गेला. दडपणाखाली उत्तम संयम राखत अस्मिताने अचानक मिळालेल्या या संधीचा फायदा घेतला आणि निर्णायक ‘युको’ गुण मिळवत विजय निश्चित केला. सुरुवातीच्या पिछाडीनंतरही दाखवलेल्या संयमाच्या जोरावर अस्मिताने भारतासाठी या सुवर्णपदकाची नोंद केली.
दुसरीकडे हर्ष सिंगने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. या स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात २३ वर्षीय हर्षने ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी जोशुआ काट्झचा पराभव करत हा ऐतिहासिक पराक्रम केला. एकाच दिवसात भारताने ज्युदोमध्ये जिंकलेले हे दुसरे सुवर्णपदक ठरले.
आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या हर्षने अत्यंत संयमी आणि रणनीतिक खेळ करत ऑलिम्पियन काट्झचे आव्हान मोडून काढले. चार मिनिटांच्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. सामना संपण्यास अवघे ४१ सेकंद शिल्लक असताना हर्षने अत्यंत सुंदर ‘वझा-अरी’ गुण मिळवत सामन्यात आघाडी घेतली आणि अखेरच्या सेकंदापर्यंत ती कायम राखत विजय निश्चित केला.
२८ वर्षीय काट्झ याने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले असून २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले होते. काट्झचे आई-वडीलही माजी ज्युडोपटू असून त्याचे वडील ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय प्रशिक्षक राहिले आहेत. अशा तगड्या कौटुंबिक व क्रीडा पार्श्वभूमी असलेल्या प्रतिस्पर्ध्याला नमवून हर्षने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी यशोगाथा लिहिली आहे.
एकूणच शुक्रवारचा दिवस ज्युदोसह भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी लाभदायी ठरला. भारताची पदकसंख्या आता २० पर्यंत वाढली आहे. यामध्ये ५ सुवर्ण, ११ रौप्य व ४ कांस्य अशा पदकांचा समावेश आहे. भारतीय संघ पदकतालिकेत सध्या नवव्या क्रमांकावर आहे. शनिवारी व रविवारी भारताच्या खात्यात किमान ५ ते १० पदकांची भर पडू शकते. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा उत्तम सराव झाला आहे, असे म्हणता येऊ शकते.
पंतप्रधान मोदींकडून कौतुक
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हर्ष सिंगचे अभिनंदन. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीतून त्याची जिद्द आणि समर्पण स्पष्टपणे दिसून येते. त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. खरोखरच एक सुवर्णमय कामगिरी! महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या ज्युडो अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अस्मिता डेचा अभिमान वाटतो! ही कामगिरी सदैव स्मरणात राहील आणि ज्युडो खेळाची लोकप्रियता वाढवण्यास हातभार लावेल. तिच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.
आज असंख्य पदकांसाठी दावेदारी
भारताला शनिवारी अनेक पदके मिळू शकतात. राष्ट्रकुल स्पर्धेत शुक्रवारचा दिवस भारताच्या पाचही बॉक्सर्ससाठी धडाकेबाज ठरला. प्रीती पवार, अरुंधती चौधरी, जास्मिन लंबोरिया, अंकुश पंघाल व जादुमणी सिंह यांनी आपापल्या वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. हे पाचही जण शनिवारी सुवर्णपदकासाठी दावेदारी सादर करतील.
महिलांच्या ७० किलो वजनी गटात अरुंधती चौधरीने वेल्सच्या गतविजेत्या रोझी एकल्सला पराभूत करत मोठा उलटफेर नोंदवला. तिच्यासह जास्मिन लंबोरिया (महिला ५७ किलो), प्रीती पवार (महिला ५४ किलो), अंकुश पांघाल (पुरुष ८० किलो) आणि जादुमणी सिंह (पुरुष ५५ किलो) यांनी आपापले उपांत्य सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे यांच्यावर लक्ष असेल. तसेच ज्युदोमध्ये पदके अपेक्षित आहे. शुक्रवारी मध्यरात्री नीरज चोप्रादेखील भालाफेकीत कमाल करेल, अशी अपेक्षा आहे. एकूणच भारताची पदकसंख्या वाढणार आहे.