

नवी दिल्ली : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार संपून अवघे दोन दिवस झाले असतानाच आता भारतासह जगभरातील क्रीडा चाहत्यांना आणखी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वेध लागले आहेत. ग्लास्गो येथे २३ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (कॉमनवेल्थ गेम्स) आयोजन करण्यात येणार असून यामध्ये भारताचे १२६ खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रीडापटूंकडून पदकांची लयलूट अपेक्षित आहे.
यंदा राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगणार असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. खर्च आवाक्याबाहेर गेल्याने दोन शहरांनी आधीच या स्पर्धेचे यजमानपद नाकारले होते. तसेच तयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने बऱ्याच खेळांना वगळण्यात आले. बॅडमिंटन, बीच व्हॉलीबॉल, क्रिकेट, डायव्हिंग, हॉकी, माऊंटेन बायकिंग, तालबद्ध जिम्नॅस्टिक्स, रोड सायकलिंग, रग्बी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथलॉन असे विविध खेळ व त्यांचे प्रकार यावेळी स्पर्धेचा भाग नसतील.
भारताला २०३०च्या राष्ट्रकुलचे यजमानपद भूषवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या कामगिरीवर नक्कीच संपूर्ण विश्वाचे लक्ष असेल. २०३०मध्ये अहमदाबादला राष्ट्रकुल होईल. त्यापूर्वी यंदा आपले क्रीडापटू किती पदके जिंकणार, हे पाहणे निर्णायक ठरेल. सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धादेखील होणार आहे. यंदा राष्ट्रकुलमध्ये ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांत भारताला पदकांची अधिक अपेक्षा आहे. कारण भालाफेकीत नीरज चोप्रा, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदकविजेती लव्हलिना बोर्गोहीन यांच्यावर भारताची भिस्त असेल.
भारताने २०१० मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते, जिथे १०१ पदकांसह (३८ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य) सर्वोत्तम दुसरी कामगिरी नोंदवली होती. त्या तुलनेत आता क्रीडा व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून गेम्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, एकात्मिक नियंत्रण कक्ष आणि विविध क्रीडा स्थळांमधील थेट समन्वय समजून घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे भारताचे पथक प्रमुख ५५ वर्षीय रोहित राजपाल यांनी नमूद केले. भारत या स्पर्धेत आठ खेळांमध्ये सहभागी होणार असून ३x३ बास्केटबॉल आणि नेटबॉलमधून माघार घेतली आहे. यात नेमबाजी, कुस्ती, हॉकी आणि बॅडमिंटन हे मुख्य खेळ नसल्यामुळे पदकांच्या संख्येची थेट तुलना करणे अयोग्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्लास्गो येथील आठ मैलांच्या परिघात चार मुख्य ठिकाणांवर ही स्पर्धा आयोजित केली जाणार असून खेळाडूंसाठी पारंपरिक क्रीडाग्रामऐवजी हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी फिरत्या बसची सुविधा आणि रात्रीच्या वेळी भारतीय जेवणाची सोय करणाऱ्या उपाहारगृहांची निश्चिती करण्यात आली आहे. तसेच एका १६ वर्षीय अपंग सायकलपटूच्या प्रशिक्षकासोबतच्या प्रवासाबाबतचा प्रश्नही सोडवण्यात आला असून तिच्यासाठी योग्य मदतनीस आणि प्रशिक्षकाची सोय करण्यात आल्याची माहिती राजपाल यांनी दिली. त्यामुळे आता एकूणच फिफा विश्वचषकानंतर राष्ट्रकुलचे वेध लागले आहेत.
पदकांइतकाच अनुभव महत्त्वाचा !
राष्ट्रकुलमध्ये भारताचे यश हे केवळ जिंकलेल्या पदकांवरून नव्हे, तर २०३० मधील अहमदाबाद येथील शताब्दी आवृत्तीच्या आयोजनापूर्वी मिळवलेल्या ज्ञानावरून मोजले जाईल, असे भारताचे पथक प्रमुख (चीफ दी मिशन) रोहित राजपाल यांनी सांगितले. २०३०च्या आयोजनात कोणतीही कसर राहू नये यासाठी मैदानाबाहेरील कामगिरीही अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी खेळाची बाजू आणि मैदानाबाहेरील व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. भारतामध्ये पुढील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना कामगिरी अधिक सुधारता यावी, यासाठी ज्ञान-हस्तांतरण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह वरिष्ठ क्रीडा प्रशासक, गुजरातचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या स्पर्धेच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी ग्लास्गो येथे उपस्थित राहणार आहेत.