Commonwealth Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा धडाका; ९ पदके निश्चित

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारताच्या बॉक्सिंग संघाने चमकदार कामगिरी करत एकाच दिवसात पाचच्या पाच सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला.
Commonwealth Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा धडाका; ९ पदके निश्चित
Commonwealth Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा धडाका; ९ पदके निश्चित (Photo-X/@WeAreTeamIndia)
Published on

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारताच्या बॉक्सिंग संघाने चमकदार कामगिरी करत एकाच दिवसात पाचच्या पाच सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला. नरेंद्र बेरवाल, अंकुश यादव, साक्षी चौधरी, अरुंधती चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपआपल्या गटातील उपांत्य फेरीत धडक मारून भारतासाठी किमान कांस्यपदके निश्चित केली आहेत. या पाच विजयांसह भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या एकूण बॉक्सर्सची संख्या नऊवर पोहोचली आहे, ज्यामुळे भारताची ९ पदके पक्की झाली आहेत.

या कामगिरीसह भारतीय संघाने २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील सात पदकांचा (तीन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य) विक्रम मोडीत काढला आहे. बुधवारी विजय मिळवलेल्या पाच खेळाडूंनी लव्हलिना बोर्गोहाईन (७५ किलो), प्रिया घंघास (६० किलो), प्रीती पवार (५४ किलो) आणि जादुमणी सिंग (५५ किलो) यांच्या यादीत स्थान मिळवले, ज्यांनी यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली होती.

महिलांच्या ५१ किलो वजनी गटात साक्षीने नॉर्दर्न आयर्लंडच्या केटलिन फ्रायर्सचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. उंच आणि लांब पल्ल्याचा फायदा घेत साक्षीने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. माझ्या प्रतिस्पर्ध्याची रणनीती जवळून लढण्याची होती, मात्र मी लांबून ठोसे मारण्याच्या माझ्या कौशल्याचा वापर केला, असे साक्षीने सामन्यानंतर सांगितले. तर ७० किलो गटात अरुंधती चौधरीने न्यूझीलंडच्या मॉर्गन हेंडरसनविरुद्ध ३-१ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून कांस्यपदक पक्के केले. पुरुष गटात माजी जागतिक युवा विजेता आणि जागतिक क्रमांकाचा पाचवा बॉक्सर सचिन सिवाच याने ६० किलो गटात बोत्सवानाच्या ट्रेझर मोरेमीचा ५-० असा धुव्वा उडवला. सर्व पाच न्यायाधीशांनी सचिनच्या बाजूने निकाल दिला. ८० किलो गटात गेल्या वर्षीच्या वर्ल्ड बॉक्सिंग कपचा रौप्यपदक विजेता अंकुश यादव याने सेशल्सच्या जेड मायकॉकवर ५-० अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दिवसातील शेवटच्या लढतीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नरेंद्र बेरवालने ९०+ किलो वजनी गटात सामोआच्या मायकेल सेकोवर ३-२ अशा विभाजित निर्णयाने मात केली. दोन गुण वजा होऊनही नरेंद्रने अखेरच्या फेरीत सेकोला नामोहरम करत विजय मिळवला आणि नववे पदक पक्के केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in