Commonwealth Games 2026 : अवघ्या एका किलोने लवप्रीतचे सुवर्ण हुकले

भारताच्या लवप्रीत सिंगला गुरुवारी मध्यरात्री राष्ट्रकुलमधील ऐतिहासिक सुवर्णपदकाने अवघ्या एका किलोने हुलकावणी दिली. स्नॅचमधील राष्ट्रकुल स्पर्धेचा विक्रम मोडत पुरुषांच्या १०९ किलोपेक्षा अधिक (प्लस ११० किलो) वजनी गटात लवप्रीतने रौप्यपदकाची कमाई केली.
Commonwealth Games 2026 : अवघ्या एका किलोने लवप्रीतचे सुवर्ण हुकले
Commonwealth Games 2026 : अवघ्या एका किलोने लवप्रीतचे सुवर्ण हुकले
Published on

ग्लासगो : भारताच्या लवप्रीत सिंगला गुरुवारी मध्यरात्री राष्ट्रकुलमधील ऐतिहासिक सुवर्णपदकाने अवघ्या एका किलोने हुलकावणी दिली. स्नॅचमधील राष्ट्रकुल स्पर्धेचा विक्रम मोडत पुरुषांच्या १०९ किलोपेक्षा अधिक (प्लस ११० किलो) वजनी गटात लवप्रीतने रौप्यपदकाची कमाई केली. न्यूझीलंडच्या डेव्हिड लिटीने एकूण ३८९ किलो (१६६+२२३) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर लवप्रीतने ३८८ किलो (१७६+ २१२) वजनासह रौप्यपदकावर नाव कोरले. इंग्लंडच्या अँड्रू ग्रिफिथने ३५६ किलो वजनासह कांस्यपदक मिळवले.

मागील राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या लवप्रीतच्या या कामगिरीमुळे भारताची वेटलिफ्टिंगमधील पदकांची संख्या आठवर (१ सुवर्ण, ६ रौप्य, १ कांस्य) पोहोचली. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील बल सिकंदर या सीमावर्ती गावातील रहिवासी असलेला २८ वर्षीय लवप्रीत एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येतो. त्याचे वडील टेलर असून आजोबा भाजी विकण्याचे काम करत असत. कौटुंबिक व्यवसायाऐवजी खेळात करिअर करण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्याने वयाच्या १३व्या वर्षी डीएव्ही ग्राऊंड येथे वेटलिफ्टिंगला सुरुवात केली. स्नॅच प्रकारात लवप्रीतने १६८ किलोने सुरुवात केल्यानंतर १७३ किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात १७६ किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता.

क्लीन अँड जर्क फेरीत न्यूझीलंडच्या लिटीने जोरदार पुनरागमन केले. लवप्रीतने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले. अंतिम प्रयत्नात त्याने सुवर्णपदकासाठी २१७ किलो वजनाचा धाडसी प्रयत्न केला; परंतु त्याला यश आले नाही. त्यानंतर लिटीने २२३ किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कमधील नवा राष्ट्रकुल विक्रम नोंदवत सुवर्णपदक निश्चित केले. स्नॅचमधील कामगिरीनंतर सुवर्णपदकाची आशा होती, परंतु अंतिम प्रयत्नात यश न आल्याने काहीशी निराशा झाली असली, तरी या कामगिरीचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया लवप्रीतने दिली.

दरम्यान, ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली होती. आता फक्त स्पर्धेचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. यावेळी फक्त १० खेळांचा समावेश आहे.

भारताने वेटलिफ्टिंगमध्ये यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ८ पदके कमावली. यामध्ये मीराबाई चानूचे सुवर्ण, ६ रौप्य व १ कांस्यपदकाचा समावेश आहे. २०२२मध्ये भारताने वेटलिफ्टिंगमध्ये १० पदके पटकावली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in