Commonwealth Games 2026 : तजिंदरपाल, समरदीप अंतिम फेरीत

भारताचे अव्वल क्रीडापटू तजिंदरपाल सिंग तूर आणि समरदीप सिंग यांनी राष्ट्रकुलमध्ये पुरुष गोळाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Commonwealth Games 2026 : तजिंदरपाल, समरदीप अंतिम फेरीत
Commonwealth Games 2026 : तजिंदरपाल, समरदीप अंतिम फेरीत(Photo-X/@WeAreTeamIndia)
Published on

ग्लासगो : भारताचे अव्वल क्रीडापटू तजिंदरपाल सिंग तूर आणि समरदीप सिंग यांनी राष्ट्रकुलमध्ये पुरुष गोळाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत फारसा अतिरिक्त ताण न घेता दोन्ही भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी करून दाखवली. गुरुवारी या क्रीडा प्रकाराची अंतिम फेरी पार पडणार आहे.

राष्ट्रीय विक्रमवीर ३१ वर्षीय तजिंदरपालने अ-गटात स्वयंचलित पात्रतेसाठी निश्चित केलेला २० मीटरचा टप्पा दुसऱ्या प्रयत्नात पार केला. पहिल्या प्रयत्नात १९.९३ मीटर अंतर नोंदवल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने २०.१४ मीटर अंतरावर गोळा फेकला. दोन्ही गट मिळून ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यामुळे तजिंदरपालने तिसरा प्रयत्न केलाच नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारा तजिंदरपाल २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत आठव्या स्थानी राहिला होता, तर २०२२च्या स्पर्धेत दुखापतीमुळे त्याला सहभागी होता आले नव्हते. तजिंदरपालच्या नावावर २१.७७ मीटरचा राष्ट्रीय विक्रम नोंदवलेला आहे.

दुसऱ्या बाजूला ब-गटात खेळणाऱ्या २५ वर्षीय समरदीप सिंग गिल याने पहिल्याच प्रयत्नात १९.९५ मीटर कामगिरी केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने १९.७५ मीटर अंतर गाठले, तर तिसरा प्रयत्न फाऊल ठरला. दोन्ही गट मिळून एकूण १५ खेळाडूंपैकी समरदीप पाचव्या स्थानावर राहिला. अ-गटात ७ आणि ब-गटात ८ खेळाडू सहभागी झाले होते. २० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर पार करणारे अथवा सर्वोत्तम १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in