पतियाळा : पतियाळा येथील महिला खेळाडूंच्या हॉस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी प्रवेश करत असल्याचे दिसून आल्याने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टर अंचता शेऊली याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी सुरू असलेल्या सराव शिबिरातून त्याची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली.
गुरुवारी रात्री त्याने सुरक्षा नियमांचा भंग करत महिलांच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश केला होता. २२ वर्षीय अचंता शेऊली हा पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. महिला हॉस्टेलच्या सुरक्षारक्षकाने अंचता शेऊलीचा या हॉस्टेलमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडीओ काढला. “अशाप्रकारचे बेशिस्त वर्तन आम्ही कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे आम्ही त्याला कॅम्पमधून तत्काळ बाहेर जाण्यास सांगितले आहे,” असे भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
पतियाळा येथील एनआयएस आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) कार्यकारी संचालक विनीत कुमार यांना तत्काळ परिस्थितीची माहिती देण्यात आली. या घटनेचा प्रत्यक्ष पुरावा व्हिडीओ स्वरूपात असल्याने साईने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केलेली नाही. “हा व्हिडीओ विनित कुमार तसेच नवी दिल्लीतील साईच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे,” असे सूत्रांकडून समजते.
२०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शेऊलीने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. वेटलिफ्टिंग संघटनेकडून आदेश आल्यानंतर शेऊलीने शुक्रवारी सराव शिबिरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. एनआयएस पतियाळा येथे पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी वेगवेगळी हॉस्टेल आहेत. सध्या येथे बॉक्सर, ॲथलीट आणि कुस्तीपटू सराव करत आहेत. वेटलिफ्टर खेळाडूवर अशाप्रकारे शिस्तभंगाची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रकुल आणि युवा ऑलिंपिक विजेता जेरमी लालरिनुंगा याच्यावरही अशाच प्रकारची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती.
शेऊलीचे ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न भंगणार
शेऊलीची सराव शिबिरातून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे त्याला या महिन्यात थायलंड येथे होणाऱ्या आयडब्ल्यूएफ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. पॅरिस ऑलिम्पिकसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असल्याने शेऊलीचे ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न भंगणार आहे. शेऊली सध्या ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीत २७व्या स्थानी असून त्याला खंडीय कोट्याद्वारे ऑलिम्पिक पात्र होण्याची संधी आहे.