इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला गुरुवार, २८ जुलैपासून सुरुवात होत आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सुमारे २५० भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. यातील अनेक खेळाडूंकडून भारताला पदकांची अपेक्षा आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राकडून पदकांच्या सर्वाधिक अपेक्षा होत्या. मात्र, स्पर्धेच्या दोन दिवस आधीच नीरज दुखापतीमुळे बाहेर पडला. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात तो ध्वजवाहक म्हणून भारतीय चमूचे नेतृत्व करणार होता. आता त्याची ही जबाबदारी बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधू पार पाडणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ध्वजवाहक होण्याचा मान मिळणे अतिशय प्रतिष्ठेची बाब समजली जाते.
२०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सिंधू भारताची ध्वजवाहक होती. तिने त्या स्पर्धेत महिला एकेरीत रौप्यपदक जिंकले होते.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने सांगितले की, 'भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूला राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ध्वजवाहक म्हणून निवडल्याची घोषणा करताना आनंद होत आहे.'
चार सदस्यांच्या समितीने यात आयओएचे प्रभारी अध्यक्ष अनिल खन्ना, सचिव राजीव मेहता आणि खजिनदार आनंदेश्वर पांडे टीम इंडियाचे मिशन प्रमुख राजेश भंडारी यांनी या तीन खेळाडूंची नावे शॉर्टलीस्ट केली होती. त्यानंतर खन्ना आणि मेहता यांनी सिंधूची ध्वजवाहक म्हणून निवड केली.
दरम्यान, दुखापतीमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधून बाहेर पडलेला भालाफेकपटू नीरज चोप्राने एक भावनिक पोस्ट केली. २४ वर्षीय ऑलिम्पिक चॅम्पियनने हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पोस्टमध्ये त्याने आपली निराशा व्यक्त केली. यासोबतच भारतीय खेळाडूंसाठी देशातील जनतेचा पाठिंबाही मागितला आहे.