
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी १२ जानेवारीपर्यंत संघ जाहीर करण्याची मुदत आहे. यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक असून भारतीय संघातील दोन तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्या तंदुरुस्तीविषयी संभ्रम कायम आहे.
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येईल. १२ जानेवारी रोजी बीसीसीआयची बैठक होणार असून त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकांसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात येईल, असे अपेक्षित आहे. मात्र २०२३नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या शमीच्या पुनरागमनाविषयी साशंकता आहे. विजय हजारे व मुश्ताक अली स्पर्धेत शमी खेळला. मात्र गोलंदाजीनंतर त्याच्या गुडघ्यास सूजही येत होती.
दुसरीकडे पाठदुखीमुळे बुमराला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे बुमराची दुखापत कितपत गंभीर आहे, हे अद्याप समजलेले नाही. बुमरा थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणे अपेक्षित असले, तरी तो १०० टक्के तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. भारतीय संघ २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ टी-२०, तर ६ फेब्रुवारीपासून ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.
दरम्यान, रविवारी होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शहा यांचाही सन्मान करण्यात येणार असल्याचे समजते. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये ही बैठक पार पडणार आहे.