रोहितच्या स्थानाविषयी संभ्रम कायम; भारतीय खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी ॲडलेडमध्येच सरावास प्रारंभ

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांत कोणत्या स्थानी फलंदाजी करावी, याविषयी संभ्रम कायम आहे. एकीकडे सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी सोमवारी रोहितला पुन्हा सलामीला परतण्याचे संदेश दिले.
रोहितच्या स्थानाविषयी संभ्रम कायम; भारतीय खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी ॲडलेडमध्येच सरावास प्रारंभ
Published on

ब्रिस्बेन : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांत कोणत्या स्थानी फलंदाजी करावी, याविषयी संभ्रम कायम आहे. एकीकडे सुनील गावस्कर, रवी शास्त्री यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी सोमवारी रोहितला पुन्हा सलामीला परतण्याचे संदेश दिले. तर मंगळवारी चेतेश्वर पुजारा, रुद्रप्रताप सिंग यांनी रोहितने मधल्या फळीत फलंदाजी करणेच हिताचे ठरेल, असे सुचवले. त्यामुळे एकूणच सर्वांना आता तिसऱ्या कसोटीचे वेध लागले आहेत.

३७ वर्षीय रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला ॲडलेड येथे गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या दिवसरात्र कसोटीत ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून धूळ चारली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या कसोटीत भारताने जसप्रीत बुमराच्या नेतृत्वात २९५ धावांनी धडाकेबाज विजय मिळवला होता. आता १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे उभय संघांत लाल चेंडूने तिसरी कसोटी सुरू होईल. त्यासाठी भारताने मंगळवारी ॲडलेडमध्येच सरावाला प्रारंभ केला आहे. बुधवारी भारतीय संघ ब्रिस्बेनला रवाना होणार आहे.

प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी भारत-ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ही मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत किमान ४-१ अशा फरकाने यश मिळवल्यास भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत हा पराक्रम करणे सोपे नसेल. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया पहिल्या दोन स्थानांवर विराजमान आहेत.

“ऑफ स्टम्पवर पडून स्विंग होणाऱ्या चेंडूंना सामोरे जाताना रोहित सातत्याने चाचपडत आहे. त्यामुळे ब्रिस्बेनच्या वातावरणात सलामीला येणे रोहितसाठी जोखमीचे ठरू शकते. त्याने सहाव्या स्थानी फलंदाजी करणे अधिक सोयीचे ठरेल. राहुल व यशस्वी यांची जोडी एका सामन्यानंतर बदलू नये,” असे पुजारा म्हणाला. डिसेंबर २०१८नंतर प्रथमच रोहित सहा वर्षांनी एखाद्या कसोटी सामन्यात मधल्या फळीत फलंदाजीस आला. मात्र त्याला अनुक्रमे ३ व ६ धावा करता आल्या. यंदाच्या कसोटी हंगामातील ७ पैकी ६ सामन्यांत रोहितने फक्त एका अर्धशतकासह १४२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी अवघी ११.८३ इतकी आहे. स्विंग होणाऱ्या चेंडूसमोर रोहितचे सातत्याने त्रिफळाचीत होताना दिसतो.

“रोहितमध्ये आत्मविश्वासाची कमी दिसत आहे. मात्र ही मालिका ऑस्ट्रेलियात सुरू आहे. येथे भारतीय खेळपट्ट्यांप्रमाणे सलामीला येऊन तुम्ही बॅट फिरवू शकत नाही. येथे तुम्हाला धावांसाठी संघर्ष करावा लागेल. त्यामुळे जुन्या चेंडूवर सहाव्या स्थानी फलंदाजी करणे रोहितसाठी तसेच भारतासाठी हिताचे ठरेल. त्याने उर्वरित मालिकेत सहाव्या स्थानीच फलंदाजी करावी,” असे माजी गोलंदाज दोडा गणेश यांनी सांगितले. विनयनेही याच आशयाचे काहीसे मत नोंदवले आहे. त्यामुळे आता रोहित आणि संघ व्यवस्थापन कोणता निर्णय घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.

दरम्यान, रोहितप्रमाणेच ३६ वर्षीय विराटचा धावांसाठी संघर्ष सुरू आहे. विराटने पर्थ येथील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक नक्कीच झळकावले. मात्र त्याव्यतिरिक्त अन्य तीन डावांमध्ये तो पूर्णपणे चाचपडताना दिसला. बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील मालिकेपासून भारताचा यंदाचा कसोटी हंगाम सुरू झाला. तेव्हापासूनच्या ७ कसोटींमध्ये विराटने ३१५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २६.२५ इतकी असून यामध्ये फक्त एका शतकाचा समावेश आहे. गेल्या ५ वर्षांत विराटने कसोटीत तीनच शतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याच्याकडेही चाहत्यांचे लक्ष आहे.

फलंदाजांचा जोरदार सराव; गोलंदाजांची विश्रांती

रोहित, विराट, यशस्वी जैस्वाल, राहुल यांनी मंगळवारी नेटमध्ये कसून सराव केला. तसेच रवींद्र जडेजाही गोलंदाजीचा सराव करताना दिसला. मात्र जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज व नितीश रेड्डी या गोलंदाजांनी या पर्यायी सराव सत्रातून माघार घेतली. ब्रिस्बेनमध्येच भारताने २०२१मध्ये कांगारूंना धूळ चारून मालिका जिंकली होती. ३२ वर्षांनी प्रथमच त्यावेळी भारताने गॅबात कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे यावेळीही भारतीय संघाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. दुसऱ्या कसोटीत विराट ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर बाद होताना दिसला. त्यामुळे त्याने मंगळवारी सरावात या चेंडूना छेडले नाही. त्याशिवाय सुंदर व जडेजाच्या फिरकी गोलंदाजीवर त्याने जवळपास तासभर सराव केला. पुढे सरसावत काही फटकेही लगावले.

जडेजा, आकाश यांना संधी द्यावी!

भारताने तिसऱ्या कसोटीसाठी रवींद्र जडेजा व आकाश दीप यांना अंतिम ११ खेळाडूंत स्थान द्यावे, असे माजी क्रिकेटपटू बलविंदर संधू यांनी सुचवले आहे. मात्र या दोघांच्या समावेशासाठी कुणाला वगळावे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही. “ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवर जडेजा प्रभावी ठरू शकेल. तसेच तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आकाशला संघात स्थान द्यावे. तो बुमराच्या साथीने स्टम्प्सवर मारा करू शकतो. भारताला ही कसोटी जिंकणे अनिवार्य आहे. मात्र फलंदाजीच्या क्रमात त्यांनी कोणताही बदल करू नये,” असे संधू म्हणाले. रविचंद्रन अश्विन व हर्षित राणा यांना संघातील स्थान गमवावे लागू शकते.

logo
marathi.freepressjournal.in