संघनिवडीवरून वादंग! हार्दिकऐवजी सूर्याला कर्णधारपदी नेमल्याने चाहते आणि माजी क्रिकेटपटूंची टीका

मुंबईचा ३३ वर्षीय फलंदाज सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमल्याने सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे.
संघनिवडीवरून वादंग! हार्दिकऐवजी सूर्याला कर्णधारपदी नेमल्याने चाहते आणि माजी क्रिकेटपटूंची टीका
Published on

नवी दिल्ली : मुंबईचा ३३ वर्षीय फलंदाज सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमल्याने सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. हार्दिक पंड्याने टी-२० विश्वचषकात उपकर्णधारपद बजावूनही त्याची नियुक्ती न करण्यात आल्याने अनेक माजी क्रिकेटपटू तसेच चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे. तर काहींनी शुभमन गिलला थेट उपकर्णधापद दिल्याने आश्चर्यही व्यक्त केले.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने टी-२० विश्वचषक जेतेपदानंतर निवृत्ती पत्करली. त्यामुळे भारताला आता नव्याने टी-२० प्रकारात संघबांधणी करायची आहे. तसेच राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळही टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात आल्यामुळे आता गौतम गंभीरच्या प्रशिक्षण पर्वाला प्रारंभ होईल. २६ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात प्रत्येकी ३ टी-२० व ३ एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात येईल, अशी शक्यता होती. टी-२० विश्वचषकात हार्दिकच भारताचा उपकर्णधार होता.

मात्र हार्दिकची तंदुरुस्ती आणि त्याच्यावरील खेळाच्या ताणाचा (वर्कलोड मॅनेजमेंट) करता सूर्यकुमारकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघ जाहीर करण्यापूर्वी हार्दिकशी संवाद साधून त्याला याविषयी कल्पना दिली, असे समजते. सूर्यकुमारने गतवर्षी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताचे यशस्वी नेतृत्व केले. आयपीएलमध्येही त्याने काही लढतीत यापूर्वी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. तसेच रणजीमध्येही त्याला नेतृत्वाचा अनुभव आहे. २०२६मध्ये भारतात टी-२० विश्वचषक होणार असल्याने तोपर्यंत सूर्यकुमारच भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असेल, असे समजते.

त्याउलट हार्दिकने टी-२० विश्वचषकात अष्टपैलू योगदान दिले. तसेच २०२२च्या टी-२० विश्वचषकानंतर रोहित नसताना हार्दिकचा या प्रकारात भारताचे नेतृत्व करत होता. मात्र गंभीरने सूर्यकुमारला प्राधान्य दिल्याने चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे.

वासिम जाफर, आरपी सिंग या खेळाडूंनी हार्दिकला दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे. तसेच एकदिवसीय संघात संजू सॅमसन व टी-२० संघात अभिषेक शर्मा यांना स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. रवींद्र जडेजालाही एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आला आहे की विश्रांती, हे समजलेले नाही.

झिम्बाब्वेविरुद्ध नुकताच गिलच्या नेतृत्वाखाली भारताने ४-१ असे यश संपादन केले. या मालिकेत गिलने काही सामन्यांत चमक दाखवली. मात्र ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांना टी-२० संघातून डावलण्यात आल्याने चाहते नाराज आहेत. त्याउलट दोन सामन्यांत फक्त २ व २२ धावा करणाऱ्या रियान परागला मात्र संघात स्थान लाभले आहे.

गिलविषयी समाज माध्यमांवर विशेष चर्चा रंगत आहे. कर्णधार कोट्याद्वारे तो संघात खेळत आहे, असे चाहते म्हणत आहेत. त्याशिवाय गिलच्या जागी अभिषेक किंवा ऋतुराज यांचा भारतीय संघात समावेश करायला पाहिजे होता, असे मत माजी क्रिकेटपटू लक्ष्मीपती बालाजीने नोंदवले. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळतो. तर अभिषेकने यंदा हैदराबादकडून खेळताना लक्ष वेधले होते. मात्र आता त्यांना पुढील संधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. गिल व यशस्वी जैस्वाल यांची जोडी टी-२० प्रकारातून भारताकडून सलामीला येताना दिसेल, हेच सध्या स्पष्ट होत आहे.

एकदिवसीय संघाचा विचार करता गंभीरच्या विनंतीवरून विराट व रोहित यांनी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बुमराला मात्र एकदिवसीय मालिकेसाठीही विश्रांती देण्यात आली आहे. के. एल. राहुल व श्रेयस अय्यर एकदिवसीय संघात परतले असून आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळताना छाप पाडणारा हर्षित राणाही या संघात आहे. प्रतिभावान फलंदाज रियान परागला दोन्ही संघांत स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, भारत-श्रीलंका यांच्यात २६, २७ व २९ जुलै रोजी पालेकेले येथे टी-२०, तर १, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. टी-२० सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७, तर एकदिवसीय सामने दुपारी २.३० वाजता सुरू होतील. २०२१नंतर प्रथमच भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध मायदेशातच २ कसोटी व ३ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी खेळून भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जाईल. तेथूनच मग नोव्हेंबरच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे.

गेले काही आठवडे संस्मरणीय : सूर्यकुमार

भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार झाल्यापासून सूर्यकुमार यादवने प्रथमच त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. याविषयी सूर्यकुमारने इन्स्टाग्रामवर मत मांडले. “भारतासाठी खेळणे माझे भाग्य आहे. त्यातच देशासाठी टी-२० प्रकारात कर्णधारपद सांभाळण्याची संधी लाभणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्यासाठी गोष्टी सोप्या ठेवणे महत्त्वाचे आहे. मी प्रक्रियेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला गोष्टी सोप्या ठेवायला आवडतात आणि मी तसा प्रयत्न करतो. त्याचबरोबर प्रत्येकाला सांगतो की गोष्टी खरोखर सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्त काही करण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्याच प्रयत्न करू नका,” असे सूर्यकुमार म्हणाला. सूर्यकुमार २०२६च्या टी-२० विश्वचषकापर्यंत भारताचे नेतृत्व करेल, असे अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in