बीसीसीआयच्या वार्षिक करारावरून वादंग; इशान, श्रेयस दुर्दैवी; तर हार्दिक भाग्यवान ठरल्याचे माजी खेळाडूंचे मत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी वार्षिक करार यादीतून इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वगळले. बीसीसीआयने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याचा फटका या दोघांना बसला. मात्र यामुळे क्रीडा विश्वात वादंग निर्माण झाले आहे.
बीसीसीआयच्या वार्षिक करारावरून वादंग; इशान, श्रेयस दुर्दैवी; तर हार्दिक भाग्यवान ठरल्याचे माजी खेळाडूंचे मत

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी वार्षिक करार यादीतून इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वगळले. बीसीसीआयने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याचा फटका या दोघांना बसला. मात्र यामुळे क्रीडा विश्वात वादंग निर्माण झाले आहे. काही माजी खेळाडूंनी या निर्णयाचे कौतुक केले आहे, तर काहींनी विविध खेळाडूंसाठी वेगवेगळा नियम का, असा प्रश्नही विचारला आहे. तसेच हार्दिक पंड्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

२५ वर्षीय इशान व २९ वर्षीय मुंबईकर श्रेयस यांना रणजी स्पर्धेत खेळण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वीच अशा खेळाडूंवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटकडे दुर्लक्ष करून आयपीएलसारख्या टी-२० स्पर्धांद्वारे अधिक पैसे कमावण्यासह भारतीय संघात स्थान मिळवण्याचा या क्रिकेटपटूंचा विचार आहे, असे यावरून सिद्ध होते. भारताचा कर्णधार रोहित शर्मानेसुद्धा यापुढे जे कसोटी क्रिकेट खेळू इच्छितात. ज्यांना रणजीत खेळण्याची इच्छा आहे, त्यांनाच भारतीय संघात प्राधान्य देण्यात येईल, असे म्हटले होते. अखेर बीसीसीआयने या सर्व बाबींचा अभ्यास करून इशान व श्रेयसविरोधात ठोस पाऊल उचलून त्यांना करारातून वगळले.

त्याशिवाय चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, युझवेंद्र चहल यांसारख्या काही अनुभवी खेळाडूंनाही करारातून डच्चू दिला. मात्र २०१८पासून भारताच्या कसोटी संघाचा भाग नसलेल्या हार्दिक पंड्याला अ-श्रेणीत कायम राखण्यात आले आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे प्रमुख खेळाडू विश्रांतीवर असताना त्यांनाही संघात परतण्यासाठी रणजीत अथवा स्थानिक स्पर्धेत खेळणे सक्तीचे का केले जात नाही, असा प्रश्नही काहींनी विचारला आहे.

हार्दिकसाठी वेगळा नियम का?

इशान व श्रेयस हे दोघेही प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. ते लवकरच यातून सावरत संघात परततील, अशी आशा आहे. मात्र हार्दिकला किंवा त्याच्यासारख्या अन्य क्रिकेटपटूंना जर लाल चेंडूंचे (रणजी स्पर्धा) सामने खेळायचे नसतील, तर किमान त्याने पांढऱ्या चेंडूंच्या (मुश्ताक अली किंवा विजय हजारे) स्थानिक स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे नाही का? दुखापतीतून सावरल्यावर त्याला थेट आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी का? नियम सर्वांसाठी सारखा असेल, तरच योग्य. अन्यथा याद्वारे भारतीय क्रिकेटचे हित साधले जाणार नाही.

- इरफान पठाण, माजी वेगवान गोलंदाज

बीसीसीआयचा निर्णय कठोर!

श्रेयस व इशान यांनी निराश होता कामा नये. तुम्ही संघासाठी नेहमीच उल्लेखनीय योगदान दिले आहे. बीसीसीआयने कसोटी तसेच रणजी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या हेतूने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असला, तरी काहीसा कठोरही आहे. वेगवान गोलंदाजांसाठी मात्र वेगळा करार घोषित करून त्यांनी नक्कीच उत्तम पाऊल उचलले आहे.

- रवी शास्त्री, माजी प्रशिक्षक

शिक्षा मिळालीच पाहिजे!

रोहित शर्माने काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत ज्यांना कसोटीची भूक आहे, त्यांनाच प्राधान्य देऊ, असे सांगितले होते. बीसीसीआयने रोहितचा शब्द पाळला. देशांतर्गत स्पर्धांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करून बीसीसीआयने नवा पायंडा पाडला आहे. इशान व श्रेयस यांच्याव्यतिरिक्त अन्य खेळाडूंचेही याद्वारे डोळे उघडतील. मात्र हार्दिक बीसीसीआयचा लाडका आहे का?

- मकरंद वायंगणकर, ज्येष्ठ क्रिकेट विश्लेषक

विराट, रोहितनेही स्थानिक स्पर्धेत खेळावे!

बीसीसीआयचा निर्णय नक्कीच धाडसी व कौतुकास्पद आहे. भारतीय संघाचा भाग नसताना रणजी स्पर्धा किंबहुना देशांतर्गत स्पर्धा खेळणे प्रत्येकासाठी अनिर्वाय असले पाहिजे. फक्त आयपीएलवर लक्ष नको. मात्र तुम्ही विराट कोहली असाल किंवा रोहित शर्मा, तुमच्यासाठीसुद्धा हाच नियम लागू असावा. संघातून माघार घेतल्यावर अथवा दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिल्यावर त्या खेळाडूने स्थानिक स्पर्धेत तंदुरुस्ती सिद्ध करून लय मिळवावी, असे मला वाटते. फक्त दोघा खेळाडूंना अशी शिक्षा देणे चुकीचे ठरेल.

- किर्ती आझाद, माजी क्रिकेटपटू

रणजीपटूंची मेहनत वाया जाणार नाही!

शाब्बास बीसीसीआय. जे खेळाडू रणजी स्पर्धेत सातत्याने घाम गाळत आहे, त्यांना या कराराद्वारे स्पष्ट संदेश मिळेल, की तुमची मेहनत वाया जाणार नाही. क्रिकेटपेक्षा कोणताही खेळाडू मोठा नाही, हे या निर्णयाद्वारे सिद्ध झाले. काही क्रिकेटपटूंची ‘कसोटी’ होणे गरजेचेच आहे.

- संजय मांजरेकर, माजी क्रिकेटपटू

क्रिकेटपटूंनी प्राधान्य स्पष्ट करावे!

बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या खेळाडूला लाल चेंडूचे क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आधीच तसे सांगून पांढऱ्या चेंडूच्या स्थानिक स्पर्धा खेळणे गरजेचे आहे. जायबंदी खेळाडूबाबतसुद्धा हा नियम लागू करणे गरजेचा आहे. मोठे खेळाडू कामगिरीच्या बळावर संघात पुनरागमन करतात, हे आपण यापूर्वीही पाहिले आहे. इशान व श्रेयस यातून सावरतील, अशी अपेक्षा आहे.

- हर्ष भोगले, ज्येष्ठ क्रीडा समालोचक

विदेशातील माजी खेळाडूंकडूनही निर्णयाचे स्वागत

वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विशेषत: वेगवान गोलंदाजांसाठी वेगळा करार लागू केल्याने यामुळे भारतीय क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल असेल, असे मत त्यांनी नोंदवले. इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटला जितके महत्त्व आहे, तितकेच भारतात रणजी स्पर्धेला मिळायला हवे, असे मत हुसैनने नोंदवले. त्याशिवाय इंग्लंडचाच माजी क्रिकेटपटू मायकल वॉननेसुद्धा स्थानिक स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या हेतूने उचललेल्या पावलाचे समर्थन केले.

महिला क्रिकेटपटूंसाठीही समान न्याय?

महिला क्रिकेटपटूंसाठी वार्षिक करार जाहीर करण्यात येईल. तेव्हा त्यांच्यासाठीही समान न्याय लागू करण्यात यावा, अशी मागणी एका माजी क्रिकेटपटूने केली आहे. “महिलांच्या आयपीएलमधील कामगिरीवर काही खेळाडू भारतीय संघात दाखल झाले. मात्र यामुळे महिलांच्या स्थानिक स्पर्धांचे महत्त्व कमी होता कामा नये. त्यांच्यासाठीही बीसीसीआये करार जाहीर करताना ही खबरदारी बाळगावी,” असे त्या माजी क्रिकेटपटूने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in