नवी दिल्ली : रोहित शर्मा व विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तब्बल १४ महिन्यांच्या कालावधीनंतर हे दोन्ही खेळाडू टी-२० खेळताना दिसणार आहेत. मात्र यावरून समाजमाध्यमांवर सध्या चर्चा रंगत असून काही माजी खेळाडूंनी निवड समितीच्या दृष्टिकोनावर निशाणा साधला आहे.
नोव्हेंबर २०२२मध्ये टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रोहित व विराट यांनी टी-२०पासून दूर राहण्याचे ठरवले. कसोटी व एकदिवसीय क्रिकेटकडे अधिक लक्ष देण्याच्या हेतूने ३६ वर्षीय रोहित व ३५ वर्षीय विराटने हा निर्णय घेतला. मात्र आता जूनमध्ये अमेरिकेत टी-२० विश्वचषक होणार असल्याने युवा खेळाडूंना डावलून पुन्हा रोहित व विराट या अनुभवी खेळाडूंकडे निवड समिती वळली आहे. के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन या खेळाडूंकडे या मालिकेसाठी दुर्लक्ष करण्यात आले आहे. तर सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत प्रथम हार्दिक व नंतर सूर्यकुमारने भारतीय संघाचे नेतृत्व केले. मात्र हे दोघेही सध्या अनुपलब्ध असल्याने रोहितच टी-२० विश्वचषकात भारताचे कर्णधारपद भूषवेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
भारत-अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल. टी-२० विश्वचषकापूर्वी भारताची ही अखेरची मालिका असेल. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. मग मार्च ते मे महिन्यात आयपीएलचा थरार रंगेल. १ जूनपासून टी-२० विश्वचषक सुरू होणार आहे.
टी-२० विश्वचषकाचा विचार करता निवड समितीने रोहित व विराटला पुन्हा संघात घेण्याचा निर्णय योग्यच आहे. या दोन्ही खेळाडूंचा अनुभव भारताला नक्कीच उपयोगी ठरेल. मात्र यामुळे यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड यांची विश्वचषकात खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.
- शरणदीप सिंग
रोहित किंवा विराटपैकी एकाला निवडल्यास नव्या वादाला तोंड फुटले असते. त्यामुळे निवड समितीला दोन्ही खेळाडूंना निवडणे अनिवार्य होते. मात्र रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल या खेळाडूंशी भारताने तडजोड करू नये. ते टी-२० विश्वचषक खेळण्यास हकदार आहेत.
- आकाश चोप्रा
हार्दिक व सूर्यकुमार तंदुरुस्त झाल्यावर ते टी-२० विश्वचषकासाठी संघात परततील, यात शंका नाही. मात्र कर्णधारपद रोहितच भूषवेल असे दिसते. मात्र किशन, राहुल यांचे काय? तसेच आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत श्रेयस उपकर्णधार होता. मग आता त्याला विश्रांती की डच्चू?
- हरभजन सिंग