सागर कातुर्डेचे सलग नववे विजेतेपद! पारंपरिक क्रीडा महाकुंभात शरीरसौष्ठवात बाजी; खो-खोमध्ये शिवनेरी सेवा मंडळ विजयी

मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरू आहे.
सागर कातुर्डेचे सलग नववे विजेतेपद! पारंपरिक क्रीडा महाकुंभात शरीरसौष्ठवात बाजी; खो-खोमध्ये शिवनेरी सेवा मंडळ विजयी

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरू आहे. या स्पर्धेत सोमवारी शरीरसौष्ठव स्पर्धेत सागर कातुर्डेने विजेतेपद काबिज केले. त्याचे हे सलग नववे विजेतेपद ठरले. तसेच खो-खोमध्ये १२ वर्षांखालील मुलींच्या गटात शिवनेरी सेवा क्रीडा मंडळने बाजी मारली.

शरीरसौष्ठव श्री स्पर्धा रविवारी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडली. या स्पर्धेत ११४ शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ७ दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंनी आपली कला दाखवली. त्यामुळे स्पर्धेत एक आगळेवेगळे आकर्षण निर्माण झाले होते. दिव्यांग बॉडीबिल्डरांनी उपस्थितांची आणि मान्यवरांची मने जिंकली.

काही दिवसांपूर्वीच स्पोर्टिका श्री स्पर्धा जिंकणाऱ्या सागरने गेल्या दीड महिन्यांत नववे जेतेपद मिळवले. त्याला टक्कर देणारा हरमीत सिंगसुद्धा मागे नाही. त्याने या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. याच बरोबर स्पर्धेत विविध वजनी गटाच्या स्पर्धा पार पडल्या.

खो-खो स्पर्धेत शिवनेरी सेवा मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा अंतिम सामन्यात ४-२ असा दोन गुणाने पराभव केला. या सामन्यात शिवनेरीच्या अतिश्का पन्हाळे, रिद्धी शिंदे यांनी, तर श्री समर्थच्या आरक्षा महाडिक, समृद्धी ठापेकर यांनी छाप पाडली.

विविध गटांतील विजेते

८० किलो : १. सागर कातुर्डे (इन्कम टॅक्स), २. अक्षय खोत (परब फिटनेस), ३. राजेंद्र जाधव (क्रिस्त फिटनेस); ८०+ किलो : १. हरमीत सिंग (परब फिटनेस), २. प्रणव खातू (यंग दत्ताराम), ३. अभिषेक माशिलकर (जे-९ फिटनेस); दिव्यांग गट : १. मेहबूब शेख (फिटनेस जिम), २. योगेश मेहेर (टोटल फिटनेस), ३. सुरेश दासरी (परब फिटनेस)

logo
marathi.freepressjournal.in