क्रोएशिया साखळीतच गारद; इटलीची आगेकूच! भरपाई वेळेतील गोलमुळे गतविजेत्यांची १-१ अशी बरोबरी; स्पेनची अल्बानियावर मात

Euro 2024: भरपाई वेळेतील गोलमुळे गतविजेत्यांची १-१ अशी बरोबरी; स्पेनची अल्बानियावर मात
क्रोएशिया साखळीतच गारद; इटलीची आगेकूच! भरपाई वेळेतील गोलमुळे गतविजेत्यांची १-१ अशी बरोबरी; स्पेनची अल्बानियावर मात
@footballplnt_si / X

लेपझिग (जर्मनी) : युरो चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात लुका मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या क्रोएशियाचा स्वप्नभंग झाला. मॅटिया झॅकाग्नीने भरपाई वेळेत (इंजरी टाइम) केलेल्या गोलच्या बळावर गतविजेत्या इटलीने क्रोएशियाला बरोबरीत रोखून आगेकूच केली. दुसरीकडे स्पेनने वर्चस्वपूर्ण कामगिरी कायम राखताना अल्बानियावर विजय मिळवला. स्पेनचा हा सलग तिसरा विजय ठरला.

रेड बुल एरिना येथे झालेल्या ब-गटातील लढतीत क्रोएशियाला राऊंड ऑफ १६ फेरीत प्रवेश करण्यासाठी इटलीला नमवणे अनिवार्य होते. तर इटलीला बरोबरीचा एक गुणही पुरेसा ठरणार होता. त्यामुळे या निर्णायक लढतीत अनुभवी मॉड्रिच संघासाठी धावून आला व त्याने ५५व्या मिनिटाला क्रोएशियासाठी गोल नोंदवला. ९० मिनिटांपर्यंत इटलीला बरोबरी साधता न आल्याने क्रोएशिया लढत जिंकणार, असे वाटू लागले. मात्र भरवाई वेळेतील अखेरच्या मिनिटात (९०+८) बदली खेळाडू झॅकाग्नीने रिकार्डो कॅलाफोरीच्या पासला गोलजाळ्याची अचूक दिशा दाखवली आणि इटलीने बरोबरी साधली. त्यामुळे इटलीने ३ सामन्यांतील १ विजय व १ बरोबरीच्या ४ गुणांसह दुसरे स्थान मिळवून आगेकूच केली. क्रोएशिया २ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. क्रोएशियाचे प्रशिक्षक झ्लॅटको डॅलिच यांनी ८ मिनिटांचा भरपाई वेळ दिल्याबद्दल काहीशी नाराजीसुद्धा व्यक्त केली.

ब-गटाच्याच अन्य लढतीत अग्रस्थानावरील स्पेनने सलग तिसरा विजय नोंदवताना अल्बानियावर १-० अशी मात केली. स्पेनने ९ गुणांसह गटातून पहिल्या स्थानासह राऊंड ऑफ १६ फेरीत प्रवेश केला. फेरान टोरेसने १३व्या मिनिटाला केलेला गोल स्पेनसाठी निर्णायक ठरला. आता २९ जूनपासून रंगणाऱ्या बाद फेरीत इटलीसमोर अ-गटातील स्वित्झर्लंडचे आव्हान असेल. स्पेनचा प्रतिस्पर्धी संघ अद्याप ठरलेला नाही. जर्मनी व पोर्तुगाल यांनीही काही दिवसांपूर्वी बाद फेरीतील स्थान पक्के केले.

logo
marathi.freepressjournal.in