हॅटट्रिक कोणाची, दिल्लीच्या विजयाची की चेन्नईच्या पराभवाची? चेपॉकवर दुपारी रंगणाऱ्या सामन्यात फिरकीपटूंचे द्वंद्व ठरणार निर्णायक

आयपीएलच्या १८व्या साखळी सामन्यात शनिवारी दुपारी चेन्नई सुपर किंग्जसमोर दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असेल. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत फिरकीपटूंचे द्वंद्व पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सलग दोन पराभव पत्करणारा चेन्नईचा संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या दिल्लीला रोखू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
हॅटट्रिक कोणाची, दिल्लीच्या विजयाची की चेन्नईच्या पराभवाची? चेपॉकवर दुपारी रंगणाऱ्या सामन्यात फिरकीपटूंचे द्वंद्व ठरणार निर्णायक
Published on

चेन्नई : आयपीएलच्या १८व्या साखळी सामन्यात शनिवारी दुपारी चेन्नई सुपर किंग्जसमोर दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असेल. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत फिरकीपटूंचे द्वंद्व पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सलग दोन पराभव पत्करणारा चेन्नईचा संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या दिल्लीला रोखू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने मुंबईला हरवून हंगामाची सुरुवात शानदार केली. मात्र त्यानंतर बंगळुरू आणि राजस्थानविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे ३ सामन्यांतील फक्त एका विजयाच्या २ गुणांसह चेन्नईचा संघ संघर्ष करत आहे. त्यांचे पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचे लक्ष्य असेल. चेपॉकवर फिरकीपटूंना नेहमीच सहाय्य लाभले आहे. त्यामुळे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि चायनामन नूर अहमद यांच्याविरुद्ध दिल्लीच्या फलंदाजांची कसोटी लागू शकते.

दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने दोनपैकी दोन सामने जिंकले आहेत. प्रथम त्यांनी लखनऊला धूळ चारली, तर दुसऱ्या लढतीत हैदराबादला रोखले. मात्र दिल्लीचा संघ यंदाच्या हंगामात प्रथमच प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात खेळणार आहे. त्यामुळे चेन्नईतील चेपॉकच्या खेळपट्टीवर ते कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरेल. दिल्लीकडे अक्षर, कुलदीप यादव असे दर्जेदार फिरकीपटू उपलब्ध आहेत. त्यामुळे तेसुद्धा चेन्नईची फिरकीच्या जाळ्यात कोंडी करू शकतात.

दरम्यान, शनिारी दुपारी ही लढत होणार असल्याने येथे दव येणार नाही. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८० धावा केल्या, तर त्याही विजयासाठी पुरेशा ठरू शकतात. त्यामुळे लढत रंगतदार होईल.

फलंदाजी चेन्नईसाठी चिंतेचा विषय

चेन्नईच्या संघात अनेक प्रतिभावान फलंदाज असले, तरी त्यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार ऋतुराज, रचिन रवींद्र व जडेजा यांच्यावर त्यांची फलंदाजी अवलंबून आहे. राहुल त्रिपाठी, शिवम दुबे व विजय शंकर यांच्याकडून मधल्या फळीत योगदान अपेक्षित आहे. महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजी क्रमाविषयी सातत्याने चर्चा सुरू आहे. मात्र धोनी अखेरच्या पाच षटकांत आणि ५ ते ६ फलंदाज बाद झाल्यावरच फलंदाजीस येईल, हे निश्चित आहे. गोलंदाजीत फिरकी त्रिकुटासह मथीशा पाथिराना व खलिल अहमद या वेगवान जोडीवर चेन्नईची मदार आहे.

दिल्लीचे गोलंदाज सध्या लयीत

हैदराबादला १६४ धावांत गुंडाळल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास उंचावला आहे. मिचेल स्टार्कने त्या लढतीत पाच बळी मिळवले. त्याशिवाय अक्षर व कुलदीप फिरकीत छाप पाडत आहेत. फलंदाजीत फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, आशुतोष शर्मा यांच्यावर दिल्लीची भिस्त आहे. त्याशिवाय अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम यांच्यातही फटकेबाजी करण्याची क्षमता असल्याने दिल्लीला चिंता नाही.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, गुर्जापनीत सिंग, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, वंश बेदी.

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.

logo
marathi.freepressjournal.in