
आयपीएलच्या १८ व्या हंगामातील तिसरा सामना रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नईने चार गडी, पाच चेंडू राखून विजय मिळवला आणि सलग १३ वर्षांपासून हंगामाच्या पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची आपली 'परंपरा' मुंबईने कायम राखली.
१८ वर्षांपासून आयपीएल सुरू आहे. त्यापैकी पाच वेळेस मुंबईने जेतेपदालाही गवसणी घातलीये. पण, १३ वर्षांपासून पहिला सामना हारण्याची परंपरा काही बदललेली नाही. गेल्या १३ वर्षांपासून विरोधात कोणताही संघ असला तरी हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचं तोंड पहावंच लागतं. रविवारीही मुंबईने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा चेन्नईने चार गडी राखून सहज पाठलाग केला आणि मुंबईच्या पदरी पहिला पराभव पडलाच. ही गोष्ट नेटकऱ्यांच्याही लगेच लक्षात आली.
त्यानंतर लगेचच 'पहिली मॅच देवाला' हा ट्रेंड मुंबईच्या चाहत्यांनी सुरू केला आणि त्यासोबत एकाहून एक मजेशीर पोस्ट्स आणि मीम्स देखील शेअर करायला सुरूवात झाली. तर, पहिल्या सामन्यातील पराभवाचे दाखले देत आता चषक देखील मुंबईच जिंकणार असा विश्वासही काहींनी व्यक्त केला.
२०१२ पासून मुंबई इंडियन्सला कधीच पहिला सामना जिंकता आलेला नाही. पण मुंबईच्या संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० साली आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरलं आहे.