
गुवाहाटी : आरसीबीने पराभवाची धूळ चारल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत तळात घुटमळत असलेल्या राजस्थान रॉयल्सशी दोन हात करणार आहे. रविवारी हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थानचा संघ दोन सामन्यांनंतरही हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
चेपॉकच्या घरच्या मैदानावर चेन्नईला ५० धावांनी पराभूत करत बंगळुरूने आपल्या कामगिरीचा क्लास दाखवला. बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने शानदार अर्धशतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईच्या मर्यादा या सामन्यातून उघड झाल्या. दरम्यान ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या संघाला आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे.
चेपॉकवरील चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीबद्दल प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी नाराजी व्यक्त केली. या खेळपट्टीवर जर का चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करत असेल तर त्यांनी १६५ ते १७० धावा करायला हव्यात आणि प्रतिस्पर्धी संघाने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना १५५ ते १६० धावांमध्ये रोखता यायला हवे, असे फ्लेमिंग म्हणाले.
फलंदाजीचा विचार केल्यास महेंद्रसिंह धोनी हा तळात फलंदाजीला येत आहे. इम्पॅक्ट खेळाडूमुळे धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले. १७५ पेक्षा अधिक लक्ष्याचा पाठलाग करताना या क्रमाने फलंदाजी करणे संघाला परवडले नाही. प्रतिस्पर्धी संघात जागतिक दर्जाचा जोश हेझलवुड आणि दिग्गज भुवनेश्वर कुमार यांसारखे दर्जेदार गोलंदाज असल्याने त्यांनी चेन्नईला घरच्या सामन्यात रोखण्यात यश मिळवले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १६ चेंडूंत ३० धावा फटकावत लक्ष वेधून घेतले. मात्र तो जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा सामना हातून निसटलेला होता. या पार्श्वभूमीवर गुवाहाटीची खेळपट्टी चेपॉकसारखी फलंदाजांना अनुकूल असेल तर त्याचा फायदा चेन्नईला होऊ शकतो. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये ताकदवान गोलंदाज नाहीत.
यंदाच्या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांत खासकरून गोलंदाजी विभागात चेन्नईचा संघ तगडा वाटत नाही. मथिशा पथिराना आणि डावखुरा नूर अहमद हे चांगले गोलंदाज आहेत. परंतु भारतीय फलंदाजांना रोखण्यात ते अपयशी ठरत आहेत.
खलील अहमद हा चांगला गोलंदाज आहे. तो या सामन्यात कामगिरी उंचावू शकतो. त्याला फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या अनुभवी गोलंदाजांची साथ मिळेल.
मोईन अली आणि वरुण चक्रवर्ती यांनी परिस्थितीचा पुरेपुर वापर करत कोलकातासाठी चांगली कामगिरी केली. त्याच पद्धतीने अश्विन आणि जडेजा यांना आपल्या अनुभवाच्या जोरावर संजू सॅमसन, रियान पराग, शुभम दुबे, नितीश राणा आणि ध्रुव जुरेल यांच्याविरुद्ध खेळ उंचवावा लागेल.
चेन्नई सुपर किंग्ज
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, गुर्जापनीत सिंग, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, वंश बेदी.
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.
रियानच्या नेतृत्वाचा कस
रियान पराग हा नवखा कर्णधार असून आतापर्यंत झालेल्या सामन्यांत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला आहे. दबावाच्या सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना तो दडपणाखाली येत असल्याचे दिसते. यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील आजवरच्या लढती थरारक झाल्या आहेत. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ २९ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातील १६ सामन्यांत चेन्नईने बाजी मारली आहे. राजस्थानने १३ वेळा विजय मिळवला आहे.\
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप