
सिंगापूर : भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशला बुधवारी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत जेतेपदाच्या दिशेने कूच करण्याची उत्तम संधी होती. मात्र चीनचा विद्यमान जगज्जेता डिंग लिरेनने एकवेळ पिछाडीवर असूनही १३व्या फेरीत गुकेशला बरोबरीत रोखण्याची कमाल केली. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ६.५ गुण जमा असून शेवटची १४वी फेरी शिल्लक आहे. गुरुवारी १४व्या फेरीत निकाल न लागल्यास शुक्रवारी टायब्रेकरमध्ये जगज्जेता ठरवण्यात येईल. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना गुकेशला तिसऱ्यांदा बरोबरी पत्करावी लागली, हे विशेष. या स्पर्धेत सर्वप्रथम ७.५ गुणांपर्यंत पोहोचणारा खेळाडू जगज्जेता ठरतो.
२५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या लढतीत पहिल्या फेरीत गुकेशला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र दुसऱ्या फेरीत गुकेशने ३२ वर्षीय लिरेनला बरोबरीत रोखले. तिसऱ्या फेरीतील विजयासह गुकेशने त्याच्यातील कौशल्य दाखवून दिले. त्यानंतर मात्र १०व्या फेरीपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये सातत्याने बरोबरीच पाहायला मिळाली. रविवारी ११व्या फेरीत गुकेशने विजय मिळवला, तर सोमवारी १२व्या फेरीत लिरेनने बाजी मारून झोकात पुनरागमन केले. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा ६-६ गुणांची बरोबरी झाली होती.
बुधवारी झालेल्या १३व्या फेरीत दोघांकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून होते. त्यातही पहिल्या २ तासांत ४० चाली पूर्ण करणे अनिवार्य असल्याने लिरेन एकवेळ पिछाडीवर होता. त्याने १ तास ५० मिनिटांपर्यंत ३१ चालीच पूर्ण केल्या होत्या. मात्र तरीही लिरेनने उर्वरित चाली वेळेत पूर्ण करत आव्हान टिकवले. मग उर्वरित वेळेत गुकेश बचावात्मक खेळताना दिसला. अखेर ५ तासांचा संघर्ष आणि ६९ चालींच्या थरारानंतर काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या लिरेनने गुकेशला बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. त्यामुळे आता सर्वांचे १४व्या फेरीकडे लक्ष लागून आहे.
जागतिक लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरतो. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर सामना बरोबरीत सोडवता येणार नाही. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकारात ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल.
गुकेश व लिरेन यांच्यातील १३वी फेरी ६९ चालींपर्यंत रंगली. ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत अधिक काळ रंगलेली फेरी ठरली. यापूर्वी सातव्या फेरीत जवळपास ६ तास व ७२ चालींपर्यंत दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. \
गुकेशने या स्पर्धेत आतापर्यंत ३ वेळा पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना आघाडीवर असूनही बरोबरी पत्करली आहे. गुरुवारी तो काळ्या मोहऱ्यांसह खेळणार आहे.
आनंद सर माझे आदर्श आहेत. त्यांच्या उपस्थितीत जागतिक लढतीत भारताचे प्रतिनिधित्व करणे स्वप्नवत होते. १३व्या फेरीत २४व्या चालीपर्यंत मी लिरेनवर वर्चस्व राखून होतो. मात्र त्याचा मला लाभ उचलता आला नाही. गुरुवारी मी विजयासाठी आणखी परिश्रम घेईन.
- डी. गुकेश