

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम धडाक्यात सुरू झाला आहे. आता शनिवार, ४ एप्रिल रोजी चाहत्यांना यंदाच्या पर्वातील मनोरंजनाचा पहिला डबल डोस मिळणार आहे. अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे फिरोजशाह कोटला) शनिवारी दुपारी मुंबई इंडियन्ससमोर दिल्ली कॅपिटल्सला रोखण्याचे आव्हान असेल. मात्र या लढतीवर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांचा हिरमोडही होऊ शकतो. त्याचप्रमाणे शनिवारी रात्री गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स आमनेसामने येतील.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. शनिवारी मात्र मुंबई-दिल्ली लढत दुपारी ३.३० वाजता होणार असल्याने दव आणि नाणेफेकीचा कौल फारसा निर्णायक ठरणार नाही. पाऊस मात्र खलनायक ठरू शकतो. दिल्लीतील हवामानानुसार दुपारी २ वाजता पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत हा सामना उशिराने सुरू होण्याची किंवा पावसामुळे काही षटके कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने सलामीच्या लढतीत वानखेडेवर कोलकाताचा धुव्वा उडवताना २२१ धावांचे लक्ष्य सहज गाठले. रोहित शर्मा व रायन रिकल्टन यांनी साकारलेल्या तुफानी अर्धशतकांना मुंबईकर शार्दूल ठाकूरच्या प्रभावी गोलंदाजीची उत्तम साथ लाभली. त्याशिवाय जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, हार्दिक यांनीही आपापले योगदान दिले. कागदावर यंदा मुंबईचा संघ सर्वोत्तम दिसत असून ते शनिवारी सलग दुसरा विजय नोंदवण्यासाठी आतुर असतील. मुंबईचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सव खेळाडू शनिवारच्या लढतीसाठी तंदुरुस्त असल्याचे सांगितले.
दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने लखनऊवर ६ गडी राखून मात करत विजयारंभ केला. आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी दिल्लीला तारले. आता दिल्लीचा संघ घरच्या मैदानात यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळण्यास सज्ज आहे. लुंगी एन्गिडी व नटराजन यांची वेगवान जोडी दिल्लीसाठी घातक ठरत आहे. त्यांना प्रामुख्याने के. एल. राहुलकडून योगदान अपेक्षित असेल. तसेच डेव्हिड मिलवरही लक्ष असेल. गतवर्षी मुंबईने दिल्लीला दोन्ही लढतींमध्ये नमवले होते. त्यामुळे यंदा ते वचपा घेण्यास उत्सुक असतील.
रोहित, शार्दूल लयीत; सँटनरही ताफ्यात
रोहित व शार्दूल असे दोन्ही मुंबईकर खेळाडू लयीत असल्याने मुंबई इंडियन्सचा संघ निश्चिंत असेल. मात्र गोलंदाजीत मुंबईला नक्कीच सुधारणेला वाव आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर या लढतीसाठी उपलब्ध असल्याने अल्लाह गझनफरला मुंबईचा संघ वगळू शकतो. त्याशिवाय मयांक मार्कंडेऐवजी अश्वनी कुमारला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. गेल्या लढतीत मुंबईने सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवले होते. शनिवारीसुद्धा तो इम्पॅक्ट प्लेयरचीच भूमिका बजावेल, असे समजते. तिलक, रिकल्टन, हार्दिक, नमन धीर अशी दमदार फलंदाजी मुंबईकडे आहे.
अक्षर, राहुलकडून सुधारणा अपेक्षित
पहिल्या सामन्यात अक्षर व राहुल यांना फलंदाजीत छाप पाडता आली नाही. राहुल पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडता माघारी परतला. त्यामुळे यंदा दिल्लीला त्याच्याकडून दमदार खेळी अपेक्षित आहे. गोलंदाजीत कुलदीप यादव प्रभावी ठरू शकतो. दिल्लीकडे आशुतोष शर्माचा पर्यायही उपलब्ध आहे. मिचेल स्टार्कच्या अनुपस्थितीत लुंगी एन्गिडी व नटराजन यांची वेगवान जोडी चमकदार कामगिरी करत आहे.
खेळपट्टीचा अंदाज
अरुण जेटली स्टेडियमवरील खेळपट्टी क्रमांक सहावर ही लढत होणार आहे. गतवर्षी येथेच हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २७८ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र यंदा लढतीवर पावसाचे सावट असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेऊ शकतो.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, अथर्व अंकोलेकर, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मिचेल सँटनर, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम.
वेळ : दुपारी ३.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप