पॅरिस : भारताची सर्वात अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा निराशा केली. उपांत्य फेरीत आगेकूच करण्याची संधी असतानाही, सुमार कामगिरी केल्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. महिलांच्या एकेरीत कोरियाच्या सुहयेऑन नॅम हिच्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दीपिकाने निराशा केल्यामुळे तिला ४-६ असा पराभव पत्करावा लागला.
दीपिकाने शनिवारी दिवसाच्या सुरुवातीलाच जर्मनीच्या मिशेल क्रोपेन हिच्याविरुद्ध ६-४ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. मात्र नॅम हिच्याविरुद्ध तिला कामगिरी उंचावता आली नाही. चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपिकाने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुन्हा एकदा हात हलवत मायदेशी परतावे लागले आहे. लंडन, रिओ आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये निराशा केल्यानंतर यावेळी दीपिकाकडून कुणालाही पदकाची अपेक्षा नव्हती. अंकिता भगत आणि धीरज बोम्मादेवारा यांच्यासोबत मिश्र सांघिक प्रकारात चौथ्या क्रमांकावर मजल, ही तिची पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
तीनपैकी दोन सेट जिंकून ४-२ अशी आघाडी घेणाऱ्या दीपिकाने चौथ्या सेटमध्ये मात्र सुमार कामगिरी केली. चौथ्या सेटच्या पहिल्या प्रयत्नांत तिने १० गुणांचा वेध घेतल्यानंतर दुसऱ्या वेळी तिने फक्त सात गुण पटकावले. नॅमने मात्र १०, ९ आणि १० गुण मिळवत सामन्यात ४-४ अशी बरोबीर साधली. दुसऱ्या सेटमध्येही दीपिकाने ६ गुणांचा वेध घेतला होता. पाचव्या सेटमध्ये कोरियाच्या नॅमने १० गुणांसह दमदार सुरुवात केली. दीपिकाने ९ गुण मिळवल्यावर नॅमने ९ आणि १० गुण मिळवले. मात्र दीपिकाने ९, ९ गुणांची कमाई केल्यामुळे तिला ४-६ असे पराभूत व्हावे लागले.
“ही निराशाजनक कामगिरी म्हणता येईल. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मला का पराभूत व्हावे लागत आहे, हेच समजत नाही. माझ्यावर अपेक्षांचे दडपण होते. त्या दोन चुकीच्या फटक्यामुळे मी सामना प्रतिस्पर्धीला बहाल केला,” असे दीपिकाने सांगितले.