नवी दिल्ली : मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या जोरात फॉर्मात असून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारा दिल्लीचा संघ पहिल्यावहिल्या महिला प्रीमियर लीग जेतेपदासाठी उत्सुक आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदासाठीचा महामुकाबला रंगणार आहे.
गेल्या वर्षी महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पहिल्याच मोसमात दिल्ली कॅपिटल्सला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. अंतिम फेरीत त्यांना मुंबई इंडियन्सकडून सात विकेट्सनी पराभूत व्हावे लागले होते. यंदाही दिल्ली कॅपिटल्सचा संघ चांगल्या फॉर्मात असून पाच संघाच्या या स्पर्धेत त्यांनी आठ सामन्यांत १२ गुणांसह अग्रस्थान पटकावले होते. थेट अंतिम फेरी पटकावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना बंगळुरूशी होणार आहे. बंगळुरूने एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सला अवघ्या पाच धावांनी हरवले.
दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग हिने यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी केली असून आठ सामन्यांत तिच्या खात्यावर ३०८ धावा जमा आहेत. तसेच अष्टपैलू खेळाडू मरीझाने कॅप आणि जेस जोनास्सेन यांनीही प्रत्येकी ११ विकेट्स मिळवत दिल्लीच्या यशात योगदान दिले आहे. दिल्लीला या मोसमात फक्त दोन वेळाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या दोन संघांनी दिल्लीला पराभूत केले आहे.
अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड मानले जात आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या याआधीच्या चारही सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे. मात्र अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सकडून खूप साऱ्या अपेक्षा असल्यामुळे त्यांना बंगळुरूला कमी लेखून चालणार नाही. सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज शफाली वर्मा हिच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा दिल्लीला आहे. मधल्या फळीत जेमिमा रॉड्रिग्ज चांगली कामगिरी करत असली तरी अष्टपैलू अलिस कॅप्से आणि मरीझाने कॅप यांच्याकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
गोलंदाजीत जोनासन हिने आतापर्यंत दिल्लीच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून तिला कॅप आणि शिखा पांडे यांचीही मोलाची साथ लाभत आहे. डावखुरी फिरकीपटू राधा यादव हिनेही गोलंदाजीत छाप पाडली असून १० विकेट्स मिळवल्या आहेत. आता दिल्लीच्या फिरोजशाह कोटलाच्या घरच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा मैदान मारण्यासाठी शिखा पांडे सज्ज झाली आहे.
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला साखळी फेरीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना ८ सामन्यांत ४ सामने जिंकता आले. मात्र एलिमिनेटरसारख्या महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सला पाच धावांनी हरवत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. एलिस पेरी हिची अष्टपैलू कामगिरी बंगळुरूच्या यशात महत्त्वपूर्ण ठरली आहे. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यातही तिच्याकडून मोठ्या खेळीची आशा बंगळुरूला आहे. तिने आतापर्यंत ३१२ धावा काढल्या असून गोलंदाजीतही सात बळी मिळवले आहेत.
मुंबईविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात एलिस पेरीने अष्टपैलू कामगिरी साकारली नसती तर बंगळुरूचा अंतिम फेरीतील प्रवेश खडतर झाला असता. तिने सर्वप्रथम ५० चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकारासह ६६ धावांची खेळी साकारली. त्यानंतर मुंबईची सलामीवीर यास्तिका भाटिया (१९) हिला त्रिफळाचीत करत बंगळुरूच्या विजयात मोलाची भूमिका साकारली. पेरी हिला कर्णधार स्मृती मानधना, सोफी डिव्हाइन, रिचा घोष आणि सोफी मॉलिनेक्स यांच्याकडूनही साथ अपेक्षित आहे. या सर्वांनी फलंदाजीत छाप पाडली तर बंगळुरू दिल्लीविरुद्ध चांगल्या धावा जमवू शकते. मात्र दिल्लीच्या फलंदाजांना रोखायचे असेल तर रेणुका सिंग, श्रेयांका पाटील आणि जॉर्जिया वेअरहॅम या बंगळुरूच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही तुल्यबळ संघांत अंतिम लढत होणार असल्यामुळे प्रेक्षकांनाही चांगला सामना पाहण्याची पर्वणी लाभणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : तानिया भाटिया, लॉरा हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, अलिस कॅप्से, मरीझाने कॅप, शिखा पांडे, ॲॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मिन्नू मणी, पूनम यादव, अरुंधती रेड्डी, टिटास सिधू, राधा यादव, अश्वनी कुमारी, अपर्णा मोंडल आणि व्ही. स्नेहा दीप्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रिचा घोष, दिशा कसाट, स्मृती मानधना (कर्णधार), सब्बीनेनी मेघना, इंद्राणी रॉय, सतीश शुभा, हीदर नाईट, सिमरन बहादूर, नदीन डे क्लर्क, सोफी डिव्हाइन, श्रेयांका पाटील, एलिस पेरी, आशा शोभना, एकता बिश्त, केट क्रॉस, सोफी मॉलिनेक्स, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग, जॉर्जिया वेअरहॅम.
सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.पासून