

बडोदा : महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने एलिमिनेटर लढतीत गुजरात जायंट्स संघावर ३ गडी व २६ चेंडू राखून वर्चस्व गाजवले. आता गुरुवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असेल.
गुजरातने यंदाच्या हंगामात दिल्लीला आतापर्यंत दोनदा नमवले असल्याने यावेळी दिल्ली त्यांचा अडथळा पार करणार का, हे पाहणे रंजक ठरणार होते. अखेर दिल्लीने ते साध्य करून दाखवले. गुजरातने दिलेले १६९ धावांचे लक्ष्य त्यांनी १५.४ षटकांत गाठले. २०२४मध्ये बंगळुरूने दिल्लीला नमवूनच ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे आता दिल्लीला पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. दिल्लीने यापूर्वी तिन्ही हंगामात अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिन्ही वेळेस त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे आता ते पहिल्या जेतेपदासाठी आतुर आहेत.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ७ बाद १६८ धावा केल्या. बेथ मूनीने ५१ चेंडूंत ६२ धावा फटकावल्या. तर वेरहॅमने ३५ धावांचे योगदान दिले. मात्र सुरुवातीच्या १० षटकांत गुजरातची धावगती संथ होती. चिनेल हेन्रीने ३, तर नंदिनी शर्माने २ बळी मिळवले.
मग लक्ष्याचा पाठलाग करताना लिझेल ली (४३), शफाली वर्मा (३१), लॉरा वोल्वर्ड (नाबाद ३२) व जेमिमा (४१) यांनी दिलेल्या योगदानामुळे दिल्लीने १६ षटकांच्या आतच विजयी लक्ष्य गाठले व थाटात आगेकूच केली.
गार्डनरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने साखळी फेरीत १० गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने ८ गुणांसह तिसरे स्थान मिळवून आगेकूच केली. मुंबई इंडियन्स व यूपी वॉरियर्स यांना साखळीत गाशा गुंडाळावा लागला. बंगळुरूने १२ गुणांसह थेट अंतिम फेरी गाठली. स्मृती मानधनाच्या नेतृत्वात खेळताना बंगळुरूने ८ पैकी ६ सामने जिंकले.
यंदा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात चाहत्यांना डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. जून-जुलै महिन्यात महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्या दृष्टीने ही डब्ल्यूपीएल निर्णायक ठरेल.
२ नोव्हेंबर, २०२५ रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने विश्वचषक उंचावला. त्यांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना उपांत्य व अंतिम सामन्यात धूळ चारली. या ऐतिहासिक यशानंतर महिला क्रिकेटचे रूप पालटले असून चोहीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे. आता डब्ल्यूपीएलमध्ये युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणखी एक संधी मिळेल.
आतापर्यंत महिलांच्या आयपीएलचे तीन हंगाम झाले असून त्यापैकी २०२३ व २०२५मध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबईने, तर २०२४मध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वात बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. यापूर्वी दोन हंगामांमध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना झाला, तर एकदा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर महाअंतिम लढत रंगली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, बंगळुरू, यूपी, गुजरात व दिल्ली या पाच संघांचा स्पर्धेत समावेश होता. आता अंतिम सामन्याकडे लक्ष असेल.