लढा सुरूच राहील! ठिकठिकाणी सत्कार; दिल्ली ते हरयाणा रोड शो, विनेश फोगटचे ‘चॅम्पियन्स’सारखे स्वागत
Credits: Screengrab

लढा सुरूच राहील! ठिकठिकाणी सत्कार; दिल्ली ते हरयाणा रोड शो, विनेश फोगटचे ‘चॅम्पियन्स’सारखे स्वागत

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाची मान उंचावूनही पदरी निराशा पडलेली भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिचे शनिवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. तिच्या स्वागतासाठी हजारो चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती.
Published on

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाची मान उंचावूनही पदरी निराशा पडलेली भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिचे शनिवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. तिच्या स्वागतासाठी हजारो चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. मात्र त्यावेळीही आपला लढा सुरूच राहील, असे वक्तव्य विनेश फोगटने केले.

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह पंचायतीचे नेते विनेशचे स्वागत करण्यासाठी हजर होते. साक्षी मलिकला भेटल्यानंतर विनेश फोगट ढसाढसा रडली. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगही विमानतळावर तिच्या स्वागतासाठी उपस्थित होता. विनेशने यावेळी भारतीयांना दाखवलेल्या प्रेमाचे आभार मानले. पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो वजनी गटात महिलांच्या कुस्ती प्रकारात विनेशने एकाच दिवशी तीन लढती जिंकत अंतिम फेरीत मजल मारली होती. मात्र अंतिम फेरीआधी वजन तपासणीवेळी १०० ग्रॅम वजन अधिक आढ‌ळून आल्यामुळे विनेशला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. तिने या प्रकरणी क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती, मात्र लवादानेही विनेशचे अपील फेटाळून लावले.

विनेशचा निकाल १६ ऑगस्टला अपेक्षित होता. मात्र क्रीडा लवादाने दोन दिवसआधीच निकाल दिला, मात्र विनेशचे अपेक्षेप्रमाणे १७ ऑगस्ट रोजी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत झाले. ओपन जिपमधून विनेशची मिरवणूक काढण्यात आली. विनेशने हात जोडून सर्व चाहत्यांचे आभार मानले. “मी संपूर्ण देशाची आभारी आहे,” असे विनेशने हात जोडून सांगितले. त्यानंतर तिचा दिल्लीतून प्रवास हरयाणाच्या दिशेने सुरू झाला. तिच्या बलाली या गावापर्यंत पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी तिचे सत्कार करण्यात आले. जवळपास ५० गाड्यांचा जथ्था तिच्या वाहनामागे होता. दिल्लीच्या द्वारका येथे एका मंदिरात प्रार्थना केल्यानंतर ती बलालीच्या दिशेने निघाली.

विनेश म्हणाली, “संपूर्ण देशाचे खूप खूप आभार, मी खूप भाग्यवान आहे. कालपर्यंत मी स्वत:लाच दोष देत होते. मात्र या जगात माझ्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही, असे हे चित्र पाहिल्यानंतर मी म्हणू शकेन. आपला लढा यापुढेही सुरूच ठेवेन आणि आपल्या वडिलांना कधीही झुकू देणार नाही. मला सुवर्णपदक मिळाले नसले तरी काय झाले. पण आज देशाकडून जे प्रेम मिळत आहे, ते सोन्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.”

विनेशने क्रीडा लवादाकडे संयुक्त रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. मात्र क्रीडा लवादाने ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर लगेचच विनेशने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय घेतला. “मी २०३२ पर्यंत कुस्ती खेळू शकले असते, कारण माझ्यात बरीच कुस्ती शिल्लक आहे. मात्र विविध परिस्थितीच्या दबावाखाली मी निवृत्तीचा निर्णय घेतला. माझे भवितव्य यापुढे काय असेल, हे मला माहित नाही. पण ते आतासारखे नक्कीच नसेल.”

“बऱ्याच कालावधीनंतर विनेश आता मायदेशी परतली आहे. ती प्रचंड भावूक झाली आहे. त्यामुळे तिला आता कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. विनेशने महिलांसाठी दिलेला लढा प्रशंसनीय आहे. भलेही विनेशला पदक मिळाले नसेल, मात्र ती आमच्यासाठी एक चॅम्पियन आहे,” असे साक्षी मलिक हिने सांगितले.

लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाचा चीफ डे मिशन म्हणजेच पथकप्रमुख गगन नारंग यानेही विनेश चॅम्पियन असल्याचा फोटो पॅरिसच्या विमानतळावर दाखवत तिला पाठिंबा दिला होता. हे दोघेही एकाच विमानातून दिल्लीला अवतरले. “पॅरिस ऑलिम्पिकच्या क्रीडाग्राममध्ये पोहोचल्यानंतर पहिल्याच दिवसापासून ती चॅम्पियन म्हणून वावरत होती. आमच्यासाठी ती कायम चॅम्पियन असेल. लाखो लोकांचे स्वप्न साकार करण्यासाठी काही वेळेला ऑलिम्पिक पदकाची गरज नसते, हेच विनेशच्या आजवरच्या कृतीतून दिसून येते. विनेशने लाखो लोकांना प्रेरित केले आहे. त्यामुळे तिच्या धाडसाला, जिद्दीला माझा सलाम,” असे नारंगने ‘एक्स’वर म्हटले आहे. बजरंग पुनिया म्हणाला की, “विनेशचे स्वागत एखाद्या चॅम्पियनप्रमाणे झाले. संपूर्ण देश तिच्या यशाचा साक्षीदार आहे, त्या सर्वांचे खूप आभार.”

गावात ओपन गाडीतून मिरवणूक

हरयाणातील बलाल या आपल्या जन्मभूमीत दाखल होताच विनेश फोगटची उघड्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. चाहत्यांच्या उदंड प्रेमाने ती भारावून केली. ‘पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मला जरी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली, तरी चाहत्यांच्या या प्रेमाने मी भारावून गेले आहे. तुमच्याकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी एक हजार सुवर्णपदकांहून नक्कीच अधिक आहे,’ अशा शब्दात विनेश फोगटने आपल्या भावना व्यक्त केल्या.

आमच्यासाठी ती चॅम्पियनच!

आमच्या गावातून आणि आजूबाजूच्या भागांतील प्रत्येक जण विनेशच्या स्वागतासाठी दिल्लीला आला आहे. विनेशला सुवर्णपदक मिळाले नाही म्हणून काय झाले, ती आमच्यासाठी चॅम्पियनच आहे. देशाने तिला सुवर्णपदकापेक्षाही मोठा सन्मान दिला आहे, असे विनेशची आई प्रेमलता फोगट यांनी सांगितले.

विनेशच्या गावात जल्लोषाची जय्यत तयारी

विनेशच्या स्वागतासाठी बलाल गावातील हनुमान मंदिरात एकूण ७५० किलो बुंदीचे लाडू तयार करण्यात आले होते. “सोन्याचे लाडू आमच्या गावासाठी सोन्याच्या मुलीच्या स्वागतासाठी आहेत. आम्हा सर्वांसाठी हा खूप मोठा दिवस आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला लाडू बनवण्याची संधी मिळाली,” असे मनदीप स्वामी म्हणाले. बलाल गावचे माजी सरपंच राजेश सांगवान यांनी सांगितले की, “विनेशच्या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वांसाठी देशी तुपाचे पदार्थ तयार केले जात आहेत. खेळाडू, प्रशिक्षक आणि इतर लोकांना पैलवानांचा आहार दिला जाईल.”

logo
marathi.freepressjournal.in