भारताची जर्सी घातल्यामुळे स्टेडियममध्ये नाकारला प्रवेश

काही प्रेक्षकांना भारतीय जर्सी घातल्यामुळे स्टेडियममध्ये प्रवेशास मज्जाव करण्यात आला.
भारताची जर्सी घातल्यामुळे स्टेडियममध्ये नाकारला प्रवेश
Published on

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय समर्थकांशी भेदभाव झाल्याचे उघडकीस आले आहे. पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यापासून भारतीय चाहत्यांना रोखण्यात आले. या चाहत्यांनी भारतीय जर्सी परिधान केल्याने त्यांना श्रीलंका किंवा पाकिस्तानची जर्सी परिधान करण्याची सक्ती करण्यात आली.

टीम इंडियाला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या ‘भारत आर्मी’ या फॅन क्लबच्या सदस्याने सांगितले की, काही प्रेक्षकांना भारतीय जर्सी घातल्यामुळे स्टेडियममध्ये प्रवेशास मज्जाव करण्यात आला. ‘भारत आर्मी’ने ट्विटरवर लिहिले की, “आम्ही आणि इतर भारतीय क्रिकेट चाहते टीम इंडियाची जर्सी घालून सामन्याला जाऊ शकलो नाही. आमच्यासाठी ही अतिशय धक्कादायक वागणूक होती.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यांना टॅग ‘भारत आर्मी’ने लिहिले की, ‘‘आमचे काही सदस्य आशिया चषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी गेले होते. तेथे स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनी त्यांना स्टेडियममध्ये जाऊ शकत नाही, असे सांगितले. ते आमच्याशी वाईट वागले.’’

‘भारत आर्मी’ हा टीम इंडियाच्या चाहत्यांचा ग्रुप आहे. हा ग्रुप टीम इंडियाला फॉलो करतो आणि त्याचे देश-विदेशातील सामने पाहायला जातो. हा गट १९९९ मध्ये स्थापन झाला.

एजबॅस्टनच्या कसोटीदरम्यान झाले होते गैरवर्तन

भारतीय चाहत्यांशी यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीत गैरवर्तन झाले होते. पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंड संघाच्या समर्थकांनी भारतीयांवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली होती. नंतर एससीबीने हे प्रकरण गांभीर्याने घेत त्याचा तपास केला होता/ त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in