

गॉल : डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलने कसोटी संघात केलेले पुनरागमन नाबाद १३१ धावांच्या शानदार शतकाने साजरे केले. पडिक्कलच्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर २ बाद २८८ धावा अशी मजल मारत मजबूत पकड मिळवली आहे.
२०२४ मधील पर्थ कसोटीनंतर प्रथमच कसोटी सामना खेळणाऱ्या पडिक्कलने १३४ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. दिवसअखेर पडिक्कल आणि ऋषभ पंत (२७) खेळत आहेत. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ५२ धावा जोडल्या आहेत.
तत्पूर्वी, के. एल. राहुल ७७धावांवर असताना स्नायूंच्या ताणामुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्याआधी पडिक्कल आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. या भागीदारीदरम्यान कर्नाटकच्या या दोन्ही फलंदाजांमध्ये पडिक्कल अधिक आक्रमक दिसला. त्याने सुरुवातीच्या २० धावा १०० च्या स्ट्राइक रेटने केल्या आणि त्यानंतर संयमी खेळ केला.
श्रीलंकेने पडिक्कलविरुद्ध पदार्पण करणाऱ्या केशरा नुवांथा या ऑफस्पिनरला गोलंदाजीला आणले. नुवांथाच्या एका चेंडूवर पडिक्कलच्या बॅटची कड लागली होती, परंतु झेल स्लिपच्या पुढे पडला. यानंतर पडिक्कलने मागे वळून पाहिले नाही. त्याने नुवांथाला चौकार मारत दबाव झुगारला, तर श्रीलंकेचा मुख्य डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याला ८१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर षटकार मारून त्याच्यावर वर्चस्व गाजवले.
दुसऱ्या बाजूने के. एल. राहुलने १२७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलने जयसूर्याच्या गोलंदाजीवर मारलेला सरळ षटकार दर्शनीय होता. लाहिरू कुमाराच्या वेगवान माऱ्याविरुद्ध राहुल सुरुवातीला थोडा अडचणीत दिसला होता, मात्र नंतर त्याने डाव सावरला. दुसऱ्या सत्रापूर्वी आलेल्या १ तास २० मिनिटांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर दोन्ही फलंदाजांनी आपली एकाग्रता कायम ठेवली.
श्रीलंकेचे सर्व गोलंदाज भारतीय फलंदाजांपुढे निष्प्रभ ठरले. अखेर राहुलला स्नायूंच्या त्रासामुळे मैदान सोडावे लागले. उकाड्यामुळे पडिक्कललाही डिहायड्रेशनचा त्रास झाला, तरीही तो खेळपट्टीवर ठाम राहिला. कोलंबोमध्ये सराव सामन्यात १४२ धावा करणाऱ्या पडिक्कलला साई सुदर्शनच्या पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले होते, ज्याचा त्याने पूर्ण फायदा घेतला. कुमाराच्या गोलंदाजीवर एक धाव घेत त्याने आपले शतक पूर्ण केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, राहुल आणि यशस्वी जयस्वाल (३७) यांच्यातील चुकीच्या समन्वयामुळे जयस्वाल धावबाद झाला. त्यानंतर प्रभात जयसूर्याने भारतीय कर्णधार शुभमन गिलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत लाहिरू उदाराकरवी झेलबाद केले. मात्र, त्यानंतर श्रीलंकन गोलंदाजांना दिवसभरात एकही गडी बाद करता आला नाही.
पडिक्कल आता विराटच्या पंक्तीत
स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा देवदत्त पडिक्कल हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. पडिक्कलच्या आधी विराट कोहलीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. कोहलीने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकादिवसीय सामन्यात ९९ चेंडूंत नाबाद ११४ धावांची खेळी केली होती. तसेच स्वातंत्र्यदिनी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पडिक्क्ल हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
पावसामुळे एक तासाचा वेळ वाया
गॉल कसोटीच्या पहिल्या दिवसाला खराब वातावरणाचा फटका बसला. पावसाने हजेरी लावल्यामुळे वारंवार खेळ थांबवण्यात आला. भारतीय संघ १ बाद १०१ अशा स्थितीत असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ओलसर झालेले मैदान पूर्ववत करण्यासाठी जवळपास सव्वा तासाचा वेळ वाया गेला. त्यानंतर भारतीय संघ २ बाद २३९ अशा स्थितीत असतानाही वरुणराजाचे आगमन झाले. पावसाला सुरुवात होण्याआधीच कर्णधार शुभमन गिल याने आपली विकेट गमावली.