टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी यापुढे अधिक मेहनत करावी लागणार

टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी यापुढे अधिक मेहनत करावी लागणार

बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला दुखापतीनंतर टीम इंडियामध्ये परतण्यासाठी डेक्सा टेस्ट अनिवार्य केली आहे

युवा खेळाडूंना टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी यापुढे अधिक मेहनत करावी लागणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या रविवारी मुंबईत झालेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाले आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, मात्र बीसीसीआयने केवळ दुखापती आणि कामाच्या ताणाबाबतचे व्यवस्थापन यासाठीच्या उपाययोजनाच अधिकृतपणे उघड केल्या. बीसीसीआयच्या या बैठकीत प्रामुख्याने टीम इंडियातील निवडीबाबत माहिती देण्यात आली.

बैठकीनंतर बीसीसीआयने अधिकृत अपडेट दिले. बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘यापुढे उदयोन्मुख युवा खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेसे देशांतर्गत हंगाम खेळावे लागतील. भारतात रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली यांसारख्या मोठ्या देशांतर्गत स्पर्धांमधून चमकदार कामगिरी करावी लागेल.

बीसीसीआयने टीम इंडियात खेळण्यासाठी किती सामने आवश्यक असतील, हे मात्र स्पष्ट केलेले नाही. यो-यो टेस्टबरोबरच बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला दुखापतीनंतर टीम इंडियामध्ये परतण्यासाठी डेक्सा टेस्ट अनिवार्य केली आहे. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, भारतीय कर्णधार रोहित शर्मा, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि पुरुष निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा उपस्थित होते.

भारतीय संघाच्या कामगिरीबाबतचा आढावा घेण्यासाठीची ही बैठक बरेच दिवस प्रलंबित राहिली होती. बीसीसीआयने टी-२० विश्वचषक २०२२ नंतर संघाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती.

एकदिवसीय मालिकेत खालच्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशकडून झालेल्या पराभवाने बीसीसीआयच्या चिंता वाढविली होती. या वर्षी वन-डे विश्वचषकही होणार आहे. त्यामुळे जबोर्डाचे लक्ष वन-डे फॉरमॅटवर अधिक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in