डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : नीरजचे अग्रस्थान हुकले; मात्र अंतिम फेरीसाठी पात्र

डायमंड लीगची अंतिम फेरी १६ व १७ सप्टेंबर रोजी अमेरिका येथे रंगणार असून आघाडीचे सहा स्पर्धक यासाठी पात्र ठरले आहेत.
डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : नीरजचे अग्रस्थान हुकले;  मात्र अंतिम फेरीसाठी पात्र

झुरिच : भारताचा ऑलिम्पिक व जागतिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला शुक्रवारी डायमंड लीगच्या चौथ्या व अखेरच्या टप्प्यात अग्रस्थानाने थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र त्याने अंतिम फेरीतील स्थान पक्के केले आहे.

झुरिच येथे गुरुवारी मध्यरात्री डायमंड लीगच्या चौथ्या टप्पाचा थरार रंगला. पुरुषांच्या भालाफेकीतील चढाओढीत नीरजला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. २५ वर्षीय नीरजने दोहा व लुसान येथील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अग्रस्थान पटकावले होते. तर तिसऱ्या टप्प्यात तो सहभागी झाला नाही. डायमंड लीगची अंतिम फेरी १६ व १७ सप्टेंबर रोजी अमेरिका येथे रंगणार असून आघाडीचे सहा स्पर्धक यासाठी पात्र ठरले आहेत.

२५ वर्षीय नीरजने सहाव्या म्हणजेच अखेरच्या प्रयत्नात ८५.७१ मीटर अंतरावर भालाफेक केली. अग्रस्थानी असलेल्या चेक प्रजासत्ताकच्या जॅकूब वॅडेलचपेक्षा नीरज अवघ्या १५ सेंटीमीटरने मागे राहिला. जागतिक स्पर्धेत कांस्य जिंकणाऱ्या जॅकूबने ८५.८६ मीटर अंतरावर भालाफेक करून पहिला क्रमांक मिळवला.

पहिल्या प्रयत्नात नीरजने ८०.७९ मीटर अंतर सर केले. त्याचे पुढील दोन प्रयत्न फाऊल ठरले. चौथ्या प्रयत्नात मग नीरजने ८५.२२ मीटर अंतरापर्यंत झेप घेतली. पाचवा प्रयत्न पुन्हा फाऊल झाल्यावर अखेरीस सहाव्या प्रयत्नाद्वारे नीरजने दुसरे स्थान पक्के करताना अंतिम फेरीतील प्रवेशावरही शिक्कामोर्तब केले. नीरजने एकूण २३ गुण मिळवले. २०२२मध्ये नीरजने डायमंड लीग जिंकण्याची किमया साधली होती.

लांब उडीत श्रीशंकर अंतिम फेरीत

लांब उडीत भारताच्या मुरली श्रीशंकरने डायमंड लीगच्या चौथ्या टप्प्यात पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली. श्रीशंकरने पहिल्याच प्रयत्नात ७.९९ मीटर अंतरावर झेप घेतली. जागतिक स्पर्धेत श्रीशंकर अंतिम फेरी गाठण्यातही अपयशी ठरला होता. येथे मात्र त्याने अव्वल ६ खेळाडूंत स्थान टिकवून ठेवले.

logo
marathi.freepressjournal.in