डायमंड लीग : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

ऑलिम्पिक आणि जगज्जेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला दोहा डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
डायमंड लीग : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

दोहा : ऑलिम्पिक आणि जगज्जेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला दोहा डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चोप्राने ८८.३६ मीटर भालाफेक केली असली तरी त्याला दोन सेंटिमीटरने जेतेपदाने हुलकावणी दिली.

२६ वर्षीय चोप्राने दमदार कामगिरी करत ८८.३६ मीटरवर भाला फेकला. पण चेक प्रजासत्ताकच्या जाकूब वाल्देच याने ८८.३८ मीटर अशी कामगिरी नोंदवत पहिल्या क्रमांकावर मजल मारली. नीरज चोप्रा या मोसमात पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये उतरल्याने त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण गतवर्षीचे जेतेपद यंदाही आपल्याकडेच राखण्यात तो अपयशी ठरला.

दोन वेळा जगज्जेता ठरलेला अँडरसन पीटर्स याने ८६.६२ मीटर भालाफेक करत तिसरे स्थान पटकावले. “यावर्षी माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक. त्याचबरोबर डायमंड लीग स्पर्धाही तयारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. यंदाच्या मोसमातील पहिल्याच स्पर्धेत माझे सुवर्णपदक दोन सेंटिमीटरने हुकले असले तरी यापुढे मी जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करीन,” असे चोप्राने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in