दिलीपची 'सुवर्ण'दौड, मोहम्मदची 'रौप्य'जोड! पॅरा-ॲथलेटिक्समधील १०० मीटर शर्यतीत भारताच्या धावपटूंची ऐतिहासिक दुहेरी पदकांना गवसणी

Commonwealth Games 2026 : नाशिकचा २३ वर्षीय धावपटू दिलीप गावितने बुधवारी मध्यरात्री सुवर्ण कामगिरी नोंदवली. त्याला मोहम्मद बासिलची रौप्यजोड लाभली. त्यामुळे भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात (टी-४७) पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकावर कब्जा केला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच असे घडले.
दिलीपची 'सुवर्ण'दौड, मोहम्मदची 'रौप्य'जोड! पॅरा-ॲथलेटिक्समधील १०० मीटर शर्यतीत भारताच्या धावपटूंची ऐतिहासिक दुहेरी पदकांना गवसणी
दिलीपची 'सुवर्ण'दौड, मोहम्मदची 'रौप्य'जोड! पॅरा-ॲथलेटिक्समधील १०० मीटर शर्यतीत भारताच्या धावपटूंची ऐतिहासिक दुहेरी पदकांना गवसणीX
Published on

ग्लासगो : नाशिकचा २३ वर्षीय धावपटू दिलीप गावितने बुधवारी मध्यरात्री सुवर्ण कामगिरी नोंदवली. त्याला मोहम्मद बासिलची रौप्यजोड लाभली. त्यामुळे भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात (टी-४७) पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकावर कब्जा केला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच असे घडले. मुख्य म्हणजे शर्यतीच्या सुरुवातीपासून ते जवळपास ६० मीटरपर्यंत दिलीप चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, अखेरच्या काही सेकंदांत दिलीपने दाखवलेला जबरदस्त वेग सर्वांना थक्क करणारा ठरला.

दिलीपने १०.७१ सेकंदांची वेळ नोंदवून स्पर्धेतील नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर केरळच्या २१ वर्षीय मोहम्मदने १०.८३ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. इंग्लंडच्या केविन सँटोस याने १०.८५ सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले. टी-४७ ही वर्गवारी हाताच्या अपंगत्वाशी संबंधित प्रकारात येते. या स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमधील ४८ किलो प्रकारात आणि शर्मिला धनकरने एफ-५७ गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत भारताची एकूण पदकसंख्या १५ पर्यंत पोहोचली होती.

ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, माऊंटेन बायकिंग, रग्बी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथलॉन यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नाहीत. भारताचे १२६ खेळाडू यावेळी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांतच भारताला पदकांची सर्वाधिक अपेक्षा आहे.

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील दिलीपला लहानपणी झाडावरून पडल्यामुळे झालेल्या दुखापतीवर योग्य वेळी उपचार न मिळाल्याने उजवा हात गमवावा लागला होता. स्थानिक प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी त्याची गुणवत्ता ओळखली आणि त्याला प्रशिक्षणासाठी तयार केले. पॅरा स्पर्धांची माहिती नसताना गावितने सामान्य खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पदके जिंकली होती.

दुसरीकडे, केरळचा २१ वर्षीय मोहम्मद हा जन्मापासूनच अवयवाच्या कमतरतेशी झुंज देत आहे. पावसाने भिजलेल्या ट्रॅकवर झालेली ही शर्यत अतिशय आव्हानात्मक होती. ‘माझी सुरुवात थोडी मंद झाली होती, पण नंतर मी वेग घेतला आणि विजय मिळवता आला’, अशी प्रतिक्रिया गवीतने दिली. सध्या नोकरीचा विचार न करता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०२८ च्या लॉस एंजेलिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणे हेच आपले मुख्य लक्ष्य असल्याचे गवीतने स्पष्ट केले.

दुसरीकडे, पुरुषांच्या एफ-४२-४४/एफ-६१-६४ थाळीफेक अंतिम फेरीत भारताच्या सागर थायत आणि देवेंद्र कुमार यांना पदकाने हुलकावणी दिली. सागरने ५१.७९ मीटर फेकीसह आशियाई विक्रम आणि मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सहावे स्थान पटकावले, तर देवेंद्रने ४८.२० मीटर फेकीसह सातवे स्थान मिळवले. एकूणच गावितने मिळवलेले यश असंख्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

वडील भावूक, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

ऐतिहासिक वेग, ऐतिहासिक गौरव, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे कौतुक केले. दिलीप हा सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील असून त्याने अलंगुण येथील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले. त्या शाळेत त्याच्या आईवडिलांचा आज गौरव करण्यात आला. “दिलीप शाळेत जायचा तेव्हा तो धावतच शाळेत जायचा, तेव्हापासूनच त्याने जिद्द ठेवली होती, मागील काही काळापासून तो बाहेर राज्यात, देशात सराव करत होता. आम्हाला फक्त एवढंच सांगायचा की, मी सुखरूप आहे माझी काळजी करू नका, त्याचा फोन पण लागत नसायचा. आज त्याने देशासाठी सुवर्णपदक जिंकले हे मला शाळेतील सरांकडून कळालं, आम्ही टीव्हीवर बघितलं नाही, आमच्याकडे लाइटच नाहीत,” अशी भावना दिलीपचे वडील महादू गावित यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in